दोनवडे : बालिंगे (ता. करवीर) येथील सरस्वती-महिपती पार्क येथील एका बंगल्यात अवैध गर्भलिंग तपासणीप्रकरणी दिगंबर मारुती किल्लेदार (रा. टिटवे, ता. राधानगरी) याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, घटनास्थळावरून एका बोगस डॉक्टरने पलायन केले. पोलिसांना छाप्यात एक सोनोग्राफी मशिन, सोनोग्राफी जेल व तपासणीची 98 किट सापडली आहेत.
अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सोमवारी पोलिसांनी डमी महिलेला या बंगल्यात पाठवले. दुपारी एक वाजता दिगंबर किल्लेदार व त्याचा साथीदार स्वप्निल पाटील हे गर्भलिंग तपासणी करत होते. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच स्वप्निल पाटील याने पलायन केले. मात्र, दिगंबर किल्लेदार याला सर्व साहित्यासह अटक करण्यात यश आले.
ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे आरोग्य अधिकारी उत्तम मदने, अॅड. गौरी पाटील, वैद्यकीय अधिकारी मोहिनी बर्गे, खुपिरे येथील डॉक्टर ढेकळे यांच्या पथकाने केली.