Mayor's Cup Football Tournament | प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून बालगोपालचा पराभव 
कोल्हापूर

Mayor's Cup Football Tournament | प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून बालगोपालचा पराभव

सम्राटनगर स्पोर्टस् टायब्रेकरवर विजयी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने बालगोपाल तालीम मंडळाला 3 विरुद्ध 1 गोलनी तर सम्राटनगर स्पोर्टस् क्लबने टायब्रेरमध्ये 3 विरुद्ध 2 गोल फरकांनी मर्दानी खेळाचा आखाडा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.

दुपारी झालेला पहिला सामना मर्दानी खेळाचा आखाडा विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस् संपूर्ण वेळेत गोल 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यावेळी सम्राटनगरच्या लवप्रीतसिंग असिफ बागवान, कुणाल माने यांनी गोल केले, तर कार्तिक जाधव यांचा फटका व्यर्थ गेला. मर्दानी खेळाचा आखाड्याकडून रणवीर जाधव, गंधर्व पाटील यांनी गोल नोंदविले, तर संदीप जानकर, प्रवीण साळोखे, निखिल साळोखे यांचे फटके गोल पोस्टच्या बाहेर गेले. 3 विरुद्ध 2 गोल फरकांनी सम्राटनगर स्पोर्टस्ने सामना खिशात घातला.

दुसर्‍या सत्रातील सामना प्रॅक्टिस क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सुरुवातीपासून आक्रमक चढाईवर लक्ष केंद्रित करून प्रॅक्टिस क्लबच्या प्रदीप शिंदे याने 8 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. या गोलची परतफेड बालगोपाल संघाचा खेळाडू सार्थक जाधव याने 24 व्या मिनिटाला केली. यानंतर सामन्यात चुरस निर्माण झाली. 39 व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या शुभम बेडेकरने मैदानी गोल करून संघाला 2 - 1 अशी पूर्वार्धात आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बालगोपालकडून आक्रमक खेळ झाला, पण प्रॅक्टिसच्या बचाव फळीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. 78 व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या रोहित भोसलेने लहान डीमधील गोंधळाचा फायदा उठवत चेंडूला गोल पोस्टची दिशा दिली. 3-1 अशी आघाडी कायम ठेवून प्रॅक्टिस क्लबने सामना जिंकला. संघाच्या अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील, देवराज मंडलिक, रोहित कुरणे, प्रतीक पोवार, वैभव देसाई तर बालगोपालच्या सागर चिले, सचिन गायकवाड, साहिल डाकवे, आकाश बावकर यांचा खेळ चांगला झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT