विशाळगड : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाने घातलेल्या अटी-शर्तींचे पालन करत विशाळगडावर ईदचा उत्सव शनिवारी शांततेत आणि साध्या पद्धतीने साजरा झाला. यावेळी एकही कुर्बानी विशाळगडावर दिली नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गडावर पहाटेपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे गडाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
शनिवारी सकाळी 9 वाजता नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर, सायंकाळी दर्ग्याचे ट्रस्टी इम्रान मुजावर, यासीन मुजावर, अबुबकर मुजावर, आयुब कागदी, हैदर मुजावर आणि माजी उपसरपंच अबुबकर मुजावर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद साजरी करण्यात आली. पोलिस प्रशासन आणि नागरिकांच्या सामंजस्यामुळे विशाळगडासारख्या संवेदनशील ठिकाणी कोणताही गालबोट न लागता ईदचा सण साजरा झाला. परिणामी, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी ठरली आहे.
ईद सणानिमित्त उच्च न्यायालयाने अटी व शर्तींसह कुर्बानीला मान्यता दिली होती, तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशाळगडासह गजापूर पंचक्रोशीत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या केंबुर्णेवाडीपासून ते गडाच्या बुरुजांपर्यंत सुमारे सात किलोमीटर परिसरात पोलिस दल तळ ठोकून होते. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार आणि पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली 100 पोलिस कर्मचारी, 40 होमगार्ड, 10 वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोन शीघ्र कृती दलाची पथके तैनात होती. केंबुर्णेवाडी येथील पोलिस नाक्यावरही 25 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. तहसीलदार गणेश लव्हटे यांनीही गडाला भेट दिली. याव्यतिरिक्त, तालुका महसूल विभागाने 1 ते 15 जूनपर्यंत गडावर बंदी आदेश लागू केले आहेत.
गडावर आज कुर्बानी साजरी करण्यास मुबारक मुजावर यांच्या गट क्रमांक 19 मधील खासगी जागेत मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, गडावर एकही कुर्बानी न देता बकरी ईद साजरी केल्याची माहिती शाहूवाडी पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.
एरव्ही गडावर कोणताही सरकारी पाहुणा आला की, कुर्बानीतील बिर्याणी त्यांच्यासाठी राखून ठेवली जात असे. पोलिस असोत वा महसूलचे अधिकारी, बिर्याणीचा आस्वाद घेऊन ते समाधानाने गड उतरत असत. गडावर औट पोस्ट ठाणे मंजूर असले, तरी ते केवळ उरुसापुरतेच उघडले जाते आणि इतरवेळी मोठ्या गुन्ह्यांचा पंचनामा शाहूवाडी पोलिस ठाण्यातच नोंदवला जातो. कित्येक दशकांपासून चालत आलेले हे चित्र वर्षभरात पूर्णपणे बदलले आहे. आता बंदोबस्तासाठी येणारी यंत्रणा डाळ-भातावर समाधान मानून डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे.