Baburao Painter: कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ‌‘मुरलीवाला‌’ पुन्हा पडद्यावर Pudhari
कोल्हापूर

Baburao Painter: कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ‌‘मुरलीवाला‌’ पुन्हा पडद्यावर

हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरचा उपक्रम; मूळ चित्रपटातील 44 मिनिटांचा भाग सध्या उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी आपल्या ‌‘महाराष्ट्र फिल्म कंपनी‌’च्या माध्यमातून साकारलेल्या ‌‘मुरलीवाला‌’ (1927) या कलाकृतीला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून ‌‘हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर‌’च्या वतीने या चित्रपटाचा मोफत खेळ दि. 21 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत पद्मा टॉकीज येथे दाखविण्यात येणार आहे.

पद्मा टॉकीजच्या 85 व्या वर्धापन दिनानिमीत्त ऋतुराज इंगळे यांच्या विशेष सहकार्याने हा अनोखा उपक्रम होणार आहे. यानिमित्त बाबुराव पेंटर यांच्या कन्या श्रीमती विजयमाला पेंटर आणि आशा पेंटर यांचा विशेष सन्मान डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या अध्यक्षतेखाली आणि नॅशनल फिल्मस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

‌‘मुरलीवाला‌’ एक दुर्मीळ ठेवा

‌‘मुरलीवाला‌’ चित्रपट एक मूकपट असून मूळ चित्रपटातील केवळ 44 मिनिटांचा भाग सध्या उपलब्ध आहे. राष्ट्रीय चित्रपट संग््राहालय (एनएफएआय) द्वारे याचे यशस्वीरीत्या संवर्धन करण्यात आले आहे. बाबुराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीतर्फे दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट आज उपलब्ध नसल्याने या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त होते. दुर्मीळ चित्रपट रसिकांसमोर आणण्यासाठी सातासमुद्रापार अमेरिकेतूनही मदतीचे हात पुढे आले आहेत. कला, नाट्य आणि साहित्य या क्षेत्रात कार्यरत असणारी कॅलिफोर्निया आर्टस्‌‍ असोसिएशन या संस्थेने आर्थिक पाठबळ दिले. चित्रपट सर्वांना विनामूल्य असून प्रवेशिका अंबाराम होजिअरी, बिनखांबी गणेश मंदिराजवळ येथे उपलब्ध असल्याची माहिती सोसायटीचे सचिव यशोधन जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT