कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. पिठासन अधिकारी म्हणून शहर निबंधक डॉ. प्रिया दळणर होत्या. निवडीनंतर शेतकरी संघाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
शिंदे यांचे अध्यक्षपदासाठी मावळते अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी नाव सुचविले तर त्याला राजसिंह शेळके यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी अपर्णा पाटील यांचे नाव रोहिणी पाटील यांनी सुचविले तर त्याला आनंदा बनकर यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष निवडीनंतर शिंदे भावनावश झाले. ते म्हणाले, आपला बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर आहे. शेतकरी संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशानेच सर्व नेते एकत्र आले आहेत. आपल्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखवू. शेतकरी संघाचे उत्पन्न किंवा नफा मिळवून देणार्या स्रोताकडे अधिक लक्ष देणार आहे. त्यामध्ये रूकडी येथील खत कारखाना, मार्केट यार्डमधील मिक्सर प्रकल्प, चटणीचे उत्पन्न यांचा समावेश आहे. बसलेला बैल उठविण्याचा निश्चित प्रयत्न करू.
आपण गोकुळची निवडणूक तीनवेळा लढविली आहे. बाजार समितीला नेत्यांनी संधी दिली. गोकुळमध्ये स्वीकृतसाठीही प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर आ. विनय कोरे यांनी मला शेतकरी संघाच्या निवडणुकीबाबत विचारले तेव्हा म्हणालो होतो, बंद पडलेल्या संघात कशाला घालता? यावर आ. कोरे यांनी, तुझ्यात काम करण्याची उमेद आहे म्हणून तुला संघात पाठवतो, असे सांगितल्यामुळे आपण संघात आलो, असे नूतन अध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.