कोल्हापूर : पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी देण्यात येणारे आयुष्मान भारत कार्ड आता रेशन दुकानांतही मिळणार आहे. जिल्ह्यातील 450 दुकानदारांकडे सुविधा उपलब्ध झाली आहे. या दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले असून आता रेशन दुकानात गेल्यानंतर संबंधित नागरिकांना आपले कार्ड काढून घेता येणार आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड आवश्यक आहे. कुटुंबातील एका सदस्यांच्या नावासह उर्वरित सदस्यांची कार्डसाठी एकत्रित अथवा स्वतंत्र नोंदणी करता येते; मात्र प्रत्येक सदस्यांचे स्वतंत्रपणे कार्ड निघते. रुग्णालयात मोफत उपचाराची प्रक्रिया काही वेळातच पूर्ण होते. कार्ड नसल्यास रुग्णालयात दाखल केल्यानंतर कार्ड काढण्याचीही प्रक्रिया केली जाते. सध्या अंगणवाडी सेविका, महा ई-सेवा केंद्रांत कार्ड काढण्यात येते. स्वत:ही हे कार्ड काढता येते, तरीही मोठ्या प्रमाणात आयुष्मान कार्ड नाहीत. राज्य शासनाने कार्ड काढण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांनाही परवानगी दिली.
रेशन धान्य दुकानदारांना महा ई-सेवा केंद्रांच्या धर्तीवरच लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला आहे. यामुळे धान्य नेण्यासाठी येणार्या ग्राहकांचे त्याच ठिकाणी कार्ड काढले जाईल. यामुळे आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया गतीने होणार आहे. यासह ज्यांना धान्य मिळत नाही, अशा कार्डधारकांनाही या दुकानात येऊन हे कार्ड काढता येणार आहे.
जिल्ह्यात या कार्डसाठी एकूण लाभार्थ्यांची संख्या 38 लाख 26 हजार इतकी आहे. यापैकी 14 लाख 79 हजार नागरिकांनी आपले आयुष्मान भारत कार्ड काढलेले आहे. हे प्रमाण एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत केवळ 38 टक्केच इतके आहे. प्रशासनाने संपूर्ण शंभर टक्के लाभार्थ्यांचे हे कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील तब्बल 23 लाख 47 हजार नागरिकांनी अद्याप हे कार्ड काढलेले नाही. यामुळे रेशन धान्य दुकानदारांकडे ही सुविधा उपलब्ध झाल्याने उर्वरित नागरिकांचे कार्ड काढणे सुलभ होणार आहे.
आयुष्मान भारत कार्ड सर्व नागरिकांनी काढून घेणे आवश्यक आहे. एकदा कार्ड काढल्यानंतर उपचाराची गरज भासल्यास ऐनवेळी होणारी धावपळ कमी होते. वेळेत आणि मोफत उपचार उपलब्ध होतो. यामुळे नागरिकांनी हे कार्ड काढावे.डॉ. रोहित खोलखुंबे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना