ऑटो मॅन्युफॅक्चरिंग आणि मंदिर अर्थव्यवस्था देईल कोल्हापूरला दिशा 
कोल्हापूर

ऑटो मॅन्युफॅक्चरिंग आणि मंदिर अर्थव्यवस्था देईल कोल्हापूरला दिशा

शिक्षण, वैद्यकीय आणि अन्न प्रक्रिया उद्योगातही संधी

पुढारी वृत्तसेवा
तानाजी खोत

कोल्हापूर ः कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्या, तरी शहरात रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम व्यवसायाला चालना मिळ्यासाठी शहराचा औद्योगिक, वैद्यकीय, धार्मिक, पर्यटन आणि शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन धोरणात्मक पावले उचलल्यास कोल्हापूरला मोठ्या संधी प्राप्त होतील आणि बांधकाम व्यवसायाला आणि पर्यायाने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

औद्योगिक उत्पादन केंद्र

महाराष्ट्रातील पुणे शहर मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाते. मात्र पुण्यात आयटी क्रांती झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राला महागाईचा फटका बसला आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक उद्योग नव्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. कोल्हापूरला आधीपासूनच ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग आहे. एकेकाळी टाटाचा 60 टक्के ट्रक आणि महिंद्राच्या 70टक्के ट्रॅक्टर कोल्हापुरात तयार होत होता, अशी कोल्हापूरची ख्याती होती. कोल्हापुरात नुकतेच काही खासगी इंडस्ट्रियल पार्क स्थापन झाले असून, त्यातील भूखंडाना मोठी मागणी आहे. सध्या कोल्हापुरात नव्या औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते.

अंबाबाई मंदिर आणि तीर्थक्षेत्र केंद्रीत अर्थव्यवस्थेचा विकास

कोल्हापूर हे महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक कोल्हापूरला भेट देतात. त्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र विकासासाठी सोयी-सुविधा विकसित केल्या, तर शहराची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते. मंदिर आणि संबंधित ठिकाणांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास भाविक जास्त दिवस कोल्हापूरमध्ये थांबतील. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल्स, ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि बांधकाम क्षेत्राला गती मिळेल.

आयटी हबमधून मिळेल बुस्ट

भौगोलिक स्थान, चांगले वाहतूक जाळे आणि शैक्षणिक संस्थांची उपस्थिती यामुळे शहरात आयटी क्षेत्र वाढीला अनुकूल स्थिती आहे. पुणे आणि बंगळुरूच्या तुलनेत कमी खर्चात आयटी कंपन्या येथे स्थिरावू शकतात. स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. नव्या स्टार्टअपसाठी शहर एक चांगले केंद्र होण्याची क्षमता शहरात आहे. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील नवीन आयटी हब म्हणून विकसित झाल्यास शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी बुस्ट मिळू शकते.

वैद्यकीय उपचारांचे केंद्र

कोल्हापूर गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारला आहे. अत्याधुनिक हॉस्पिटल्स आणि अनुभवी डॉक्टरांमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी हे शहर एक महत्त्वाचे हेल्थकेअर हब बनत आहे. पुणे मुंबईच्या तुलनेत 40 टक्के कमी खर्चात आधुनिक उपचार होतात.

शिक्षण आणि संशोधन केंद्र

कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक केंद्र आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजेसची संख्या मोठी आहे. संशोधन आणि उच्च शिक्षण सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठा वाव आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर हे मोठे शैक्षणिक केंद्र आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि शिक्षणसंस्थांच्या विस्तारामुळे निवासी प्रकल्प, हॉस्टेल्स, कमर्शियल प्रॉपर्टीला मागणी वाढू शकते.

शेती प्रक्रिया उद्योगातही संधी

उस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरला विविध प्रक्रिया युक्त कृषी जर शेती प्रक्रिया उद्योग विकसित केला गेला, तर शेतकर्‍यांना उभारी मिळेल आणि नवीन रोजगारनिर्मिती होईल. साखर कारखाने, दूध उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग वाढल्यास शेतकरी आणि कामगारांसाठी मोठ्या संधी निर्माण होतील.

कोल्हापूरने पारंपरिक औद्योगिक उत्पादनावर भर दिला, तर मोठी गुंतवणूक येऊ शकते. पुण्यासारखी मोठी औद्योगिक केंद्रे महाग झाल्यामुळे औद्योगिक कंपन्या कोल्हापुरात आपले उत्पादन केंद्र हलवू शकतात. इतर घटक अनुकूल आहेत. इथले लोक कुशल, कष्टाळू आणि सामंजस्य आहेत. सध्या मेक इन इंडियाची चर्चा सुरू आहे. कोल्हापूरला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. नवी औद्योगिक वसाहत सुरू करून पायाभूत सुविधांना चालना दिल्यास कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
गिरीश रायबागी, संचालक, रायसोनी ग्रुप
अंबाबाई मंदिर हे कोल्हापूरला मिळालेले वरदान आहे. सध्या लोक तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी खर्च करतात. त्यामुळे कोल्हापूरला तीर्थक्षेत्र केंद्रित अर्थव्यवस्था विकसित केल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल. या प्रकारच्या विकासाला मोठी संधी असून त्याला स्पर्धादेखील नाही. या बरोबरीने मेडिकल आणि एज्युकेशन हब आणि अन्नप्रक्रिया उद्योग यामध्ये देखील शहराला मोठी संधी आहे.
शंकर गावडे, संचालक, विश्वकर्मा ग्रुप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT