कोल्हापूर

कोल्हापूर : माजी नगरसेवक पुत्रावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी पेठ येथे घरात घुसून माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांचा पुत्र निखिल कोराणे याच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. सुशील लोहार, शुभम चौगुले, चेतन पोवार (रा. वेताळ माळ तालीमजवळ, शिवाजी पेठ) व एक अनोळखी तरुण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

घटनेनंतर संशयित पसार झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा सुगावा लागला नव्हता. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, शुक्रवारी (दि. 22) दुपारी निखिल हा काका विश्वनाथ कोराणे यांच्या घरी जेवणासाठी आला होता. नेमके याचवेळी संशयित तरुण काकांच्या घरात घुसले. त्यांनी निखिल कोराणे यांना शिवीगाळ, दमदाटी सुरू केली. संशयितांनी कॉलरला पकडून निखिलला बाहेर काढले.

संशयित सुशील लोहारने निखिलला उद्देशून 'काल रात्री लई ताटत होतास' असे म्हणत त्यास पुन्हा शिवीगाळ करून धमकी दिली. शुभम व चेतनने निखिलला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. चेतनने त्यास पकडून धरले. सुशीलने चाकू काढून निखिलवर हल्ल्याचा प्रयत्न केला; पण त्याने तो चुकवला.

निखिलचे काका विश्वनाथ व काकी वैजयंता तसेच वेताळ तालीम मंडळाच्या मंडपामध्ये बसलेले निखिलचे मित्र स्वप्निल टिटवेकर, पार्थ पाटील घटनास्थळी धावत आले. स्वप्निलने सुशील याच्याकडील चाकू काढून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत चेतनने गुप्तीसारखे धारदार हत्यार सर्वांवर रोखून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हत्यार हवेत फिरवून तेथून सर्वजण पसार झाले. या प्रकारामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

SCROLL FOR NEXT