गडहिंग्लज: पुढारी वृत्तसेवा
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील प्रशांत शंकर गावडे (वय ३०) या तरुणाने गडहिंग्लज तालुक्यातील वैरागवाडी येथे मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यामध्ये तो ९६ टक्के भाजला असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर सीपीआर येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सदर प्रशांत आपल्या एका नातेवाईकाला घेऊन मंगळवारी सायंकाळी नेसरी येथील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये २०० रुपयांचे पेट्रोल भरले तर एका कॅनामध्ये आणखी ३०० रुपयांचे पेट्रोल घेतले.
नातेवाईकाला माझे वैरागवाडी येथे एका साहेबांकडे काम आहे. मला तेथेपर्यंत गाडीने सोड, असे म्हणून सदर नातेवाईकाला वैरागवाडीच्या वेशीवर आणून त्याला तू बाहेर थांब, मी माझे काम आवरुन येतो, लवकर आलो तर जाऊ अन्यथा तुझे तू जा, असे सांगून तो गेला.
काही वेळानंतर प्रशांत आला नसल्याने त्याच्या नातेवाईकाने गावात काही ठिकाणी त्याला शोधले मात्र तो दिसला नाही. दरम्यान रात्री अकराच्या सुमारास प्रशांत याचा एका गल्लीत वाचवा.. वाचवा... असा जोरदार ओरडण्याचा आवाज आल्यावर लोकांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली असून, सदर प्रशांत हा आगीच्या ज्वालांमध्ये लपेटलेला आढळून आला.
लोकांनी पाणी मारुन आग विझविली व तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले. पोलिसांनीही घटनास्थळी येत परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, सदर प्रशांत हा ९० टक्क्यांपेक्षा अधिक भाजला असून, रात्री सुरुवातीचे १५ ते २० मिनिटे बोलत होता.
त्यानंतर मात्र त्याची प्रकृती गंभीर बनली असून, सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याने पेटवून घेण्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलिस घेत असून, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी बुधवारी सकाळपासून वैरागवाडी येथे जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.