हुपरी : बेकायदेशीरपणे गौण खनिज उचल करण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणारे हुपरीचे मंडल अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या अंगावर मोटार घालून चिरडण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी करण्यात आला. याप्रकरणी मुरुम माफिया युवराज मुधाळे याच्यासह डंपर व मोटारीचा चालक अशा तिघांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुपरी शहरानजीक प्लॉटिंगमध्ये रस्ता करण्यासाठी लागणारा मुरुम दूधगंगा कालवा परिसरातून बेकायदेशीरपणे उचलण्यात येत होता. याबाबतची माहिती मिळताच रॉयल्टी भरली आहे की नाही, हे पाहण्यासाठी मंडल अधिकारी शिंदे व गावकामगार तलाठी सुभाष जाधव घटनास्थळी गेले. यावेळी युवराज मुधाळे याने खाडाखोड केलेल्या जुन्या पावत्या दाखवून वादावादी केली. मुरुम भरण्यासाठी आलेला डंपर व जेसीबी त्याने साथीदारांना घटनास्थळावरून घेऊन जाण्यास सांगितले. भरधाव वेगाने वाहने जाताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न मंडल अधिकार्यांनी केला. यावेळी त्यांच्या अंगावर मोटार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.