हुपरी : कौटुंबिक कारणातून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून देवाला तेल घालण्यासाठी जात असलेल्या पट्टणकडोलीच्या ८० वर्षीय वृद्धाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. साताप्पा कल्लू कांबळे (वय ८०, रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकडोली) असे या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तक्षक दिलीप लोकरे (रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकडोली) याच्याविरोधात हुपरी पोलिसांत रविवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
साताप्पा कांबळे व संशयित तक्षक लोकरे यांच्यात गेल्या चार वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. या दोन्ही कुटुंबांत वारंवार भांडणे होत असून, वृद्ध कांबळे यांना संपविण्याची भाषा तक्षक लोकरे सातत्याने करीत होता. त्याच्या या धमकीकडे कांबळे दुर्लक्ष करीत होते. नवरात्रौत्सवानिमित्ताने साताप्पा कांबळे १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला तेल घालण्याकरिता पायी चालत जात होते. हा मोका साधून संशयित लोकरे याने कांबळे यांच्या अंगावर मागून जाणीवपूर्वक चारचाकी गाडी (क्र. एम.एच. ०९ एबी ०३१४ ) घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कांबळे यांच्या डोक्याला, उजव्या हाताला व डाव्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांचा मुलगा चंद्रकांत साताप्पा कांबळे (४४, रा. तळंदगे फाटा वसाहत, पट्टणकडोली) यांनी हुपरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.