कोल्हापूर : पाणीपट्टीवाढीच्या विरोधात शिवसैनिकांनी बुधवारी महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात सुरू असलेल्या महासभेत घुसण्याचा प्रयत्न केला. अन्यायी दरवाढ रद्द झालीच पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला; पण आयुक्त निवेदन स्वीकारण्यास न आल्याने संतप्त झालेले शिवसैनिक प्रवेशद्वार ढकलून महापालिकेत घुसले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होते.
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. या दरवाढीला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला. त्यांनी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
अधिकार्यांना खुर्चित बसू देणार नाही
सभागृहाबाहेर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहरप्रमुख मनजित माने, जिल्हा उपप्रमुख अवधूत साळोखे, पोपट दांगट यांनी अगोदर पाणी गळती रोखा, बेकायदेशीर कनेक्शन तोडा मगच पाणीपट्टीत वाढ करा, अन्यथा अधिकार्यांना खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा दिला.
पोलिसांची धावपळ सुरू
शिवसैनिकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर अधिकारी, कर्मचार्यांसह महापालिकेत आले. त्यांनी शिवसैनिकांना सभागृहात जाण्यापासून रोखले. यानंतर आंदोलक आत आलेच कसे, याचा जाब उपस्थित पोलीस कर्मचार्यांना विचारला.