शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथे एका शाळकरी मुलीला अज्ञातांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या दुसऱ्या मुलीने आरडाओरडा केल्याने अपहरणकर्ते पळून गेले. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टाकवडे-नांदणी रस्त्यावर बिराजदार वस्तीजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्राथमिक शाळा सुटल्याने दोन मुली नांदणी रस्त्याला असलेल्या मळा भागातून घरी चालत जात होत्या. यावेळी बिराजदार यांच्या वस्तीजवळ येताच पाठीमागून येणाऱ्या ओमणी व्हॅनचा दरवाजा उघडून अज्ञात व्यक्तीने एका मुलीला ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी सोबत असणाऱ्या मुलीने आरडाओरडा केल्याने वस्तीतील नागरिक गोळा झाले. त्यामुळे अपहरणकर्ते मुलीला सोडून पळून गेले. ही घटना समजताच नागरिकांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाची माहीती घेतली. असे प्रकार घडू नये, यासाठी रात्री पिढीत मुलीच्या पालकांनी शिरोळ पोलिसांत तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती.