एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला. Pudhari File Photo
कोल्हापूर

हुपरीजवळ पाठलाग करत तरुणावर सशस्त्र हल्ला

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : येथील पंचतारांकित वसाहतीत मोटारसायकलीचा पाठलाग करत अज्ञात चार हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केले. नवनाथ बाळासाहेब चोरमुले (वय 23, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) असे जखमीचे नाव असून त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.

रात्री परिसरात जोरदार विजांसह पाऊस सुरू होता. तळंदगे येथे राहणारा नवनाथ चोरमुले गावाकडे मोटारसायकलीवरून जात होता. तळंदगे रस्त्याजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी पाठलाग करत नवनाथला अडवले व त्याच्या पाठीवर, तोंडावर डाव्या बाजूला, हातावर, डोक्यावर मागील बाजूला असे धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो पावसात रस्त्यावर पडला होता. गावाकडे जाणार्‍या काहींनी हुपरी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस निरीक्षक एन. आर. चोखडे, प्रसाद कोळपे, एकनाथ भांगरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन नवनाथला हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला सीपीआरमध्ये तातडीने हलवण्यात आले. जखमी नवनाथची परिस्थिती गरिबीची आहे. तो एमआयडीसीत कामाला जातो. घटनास्थळी काहींचे चप्पल आढळले असून ते कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी तातडीने या भागात तपास मोहीम राबवली. या घटनेमागचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT