कोल्हापूर ः कोवाड (ता. चंदगड) येथील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील तब्बल 18 लाखांची रोकड लंपास करून पोलिसांनाच आव्हान देणार्यांना कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजस्थानात जाऊन जेरबंद केले. तस्लीम इसा खान (वय 20), अलीशेर जमालू खान (वय 29), तालीम पप्पू खान (वय 28), अक्रम शाबू खान (वय 25, चौघे रा. छोटे मश्जिदजवळ, सामदिका, ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोवाड येथे एसबीआयचे एटीएम आहे. 5 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ते फोडून त्यातील 18 लाख 77 हजार 300 रुपये रोख रक्कम कॅशबॉक्ससह चारचाकी वाहनातून चोरून नेली होती. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याअनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता.
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलिस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांची दोन पथके आणि चंदगड पोलिस ठाण्याचे पथक चोरीचा तपास करत होते. एटीएम मशिन कटिंग करून चोरी झाल्याने त्या अनुषंगाने घटनास्थळी व परिसरातून माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. चोरी करून जाताना चोरट्यांच्या चारचाकीने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली होती. पोलिसांनी त्या वाहनाचा तपास केला. पोलिसांच्या वाहनाला धडक दिलेली चारचाकी ही ह्युंदाई कंपनीची क्रेटा असल्याचे स्पष्ट झाले. अपघातामुळे ती चारचाकी रस्त्यावरच बंद पडल्याचे आढळले.
पोलिसांचे पथक राजस्थानला गेले. तेथे सद्दाम खान याच्याकडे चौकशी केली. खान यांनी मित्र तस्लीम खान याने नातेवाईक आजारी असल्याचे सांगून चारचाकी नेल्याचे तसेच तेव्हापासून तस्लीमने संपर्क साधला नसल्याचेही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिथे तस्लीम खान व इतरांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत.
तस्लीम खान व त्याचे इतर साथीदार पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद रोडवरील मनोर गावात सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. सहायक पोलिस निरीक्षक मसुटगे, दीपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे, हंबीर अतिग्रे यांच्या तपास पथकाने तिथे साध्या वेशात सापळा लावला. तस्लीम खान व इतरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नावे सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
संबंधित वाहनाच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी माहिती घेतली. ती नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी एमएच 01 ईबी 9918 अशी खोटी नंबर प्लेट क्रेटाला लावली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या चारचाकीचा मूळ क्रमांक आरजे 45 सीवाय 1676 असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहन मालकाचा पत्ता आणि नाव शोधून काढले. सद्दाम खान (रा. सामदिका, ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान) यांची चारचाकी असल्याचे स्पष्ट झाले.