At Minche Khurd, a lined canal broke, farmer loss
मिणचे खुर्द / पुढारी वृत्तसेवा
भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील आरोग्य केंद्राच्या पाठिमागील बाजूस अस्तरीकरण सुरू असतानाच बोगस कामामुळे दुधगंगा कालव्यास भगदाड पडून मोठे नुकसान झाले. काम सुरू असतानाच कालव्यास भगदाड पडल्याने पाटबंधारेच्या जलसंपदा विभागाच्या व ठेकेदाराच्या दुर्लक्षपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भुदरगड तालुक्यातील मुदाळ ते मिणचे खुर्द दरम्यात १७ किलोमीटर अंतर असणाऱ्या दुधगंगा उजव्या कालव्याच्या परिसरातील शेकडो एकर जमीन कालव्याच्या गळतीमुळे क्षारपड बनली होती. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यांची मागणी लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या १७ किलोमीटर अंतराच्या कालव्यासाठी १७ कोटींचा निधी मंजूर केला व चार महिन्यांपूर्वी अस्तरीकरण कामास प्रत्यक्ष सुरवात झाली.
या कालव्याच्या अस्तरीकरणाचा दर्जा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठेकेदाराच्या कामाचा दर्जा पूर्णतः निकृष्ट असून पुढे पाठ मागे सपाट अशी अवस्था या कालव्याच्या अस्तरीकणाची झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असतानाही निकृष्ट कालवा जलसंपदाने शेतकऱ्यांच्या माथी मारला आहे. सुरवातीपासूनच या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मुदाळपासून पाचवडेपर्यंत कालवा ५ फूट आहे, तर पाचवडेपासून मिणचे खुर्द पर्यंतचे अस्तरीकरण ३ फूट उंचीने केले आहे. पाचवडेपासून पुढे मिणचे खुर्द पर्यंत कालवा अस्तरीकणाच्या वरून पाणी वाहते. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन क्षारपड होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अस्तरीकणाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे.
गेली चार दिवस पाण्याचे आवर्तन सुरू आहे, पण अस्तरीकरणाच्या वरून पाणी वाहत जाऊन व ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे व पाटबंधारेच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटबंधारे व ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवार (ता. ४) सकाळच्या सुमारास अस्तरीकरण तुटून कालव्यास मोठे भगदाड पडले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आज सकाळी पहाटे अस्तरीकरण झालेला कालव्यास भगदाड पडून पाणी शेजारील शेतात घुसले. इतकी गंभीर घटना घडलेली असतानाही जलसंपदाचा एकाही अधिकारी फिरकला नाही. या घटनेकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षपणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कुर उपकालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू असून मिणचे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे जो अस्तरीकरण केलेला कालवा फूटला आहे, त्या कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास सबंधीत ठेकेदारावर कारवाई केली जाईलअशोक पवार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग कोल्हापूर
नुकतेच केलेले मिणचे कालव्याचे अस्तरीकरणाचे काम हे मुळातच निकृष्ठ दर्जाचे झाले असून, हा कालवा फूटून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी या कामांची चौकशी करून सबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी.सचिन नलवडे, शेतकरी, मिणचे खुर्द