कोल्हापूर

‘हुपरी’चा सहायक फौजदार तिवडे 9 हजारांची लाच घेताना जाळ्यात

Arun Patil

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : भांडणप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हुपरी पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार दिलीप योसेफ तिवडे (रा. पुण्यपर्व हौसिंग सोसायटी, कदमवाडी, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

हुपरी येथील तक्रारदार यांचे त्यांच्या शेजार्‍याबरोबर पाळीव कुत्रे पाळण्यावरून भांडण झाले होते. याबाबत एकमेकांवर गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार यांच्या मुलावर दाखल गुन्ह्याचा तपास तिवडे करीत होता. तपासादरम्यान तिवडे याने तक्रारदारकडे मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व मदत करतो, असे सांगून दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणीमध्ये तिवडे याने 9 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सायंकाळी हुपरी पोलिस ठाणे परिसरात सापळा रचून लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडले.

तिवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, बंबरगेकर, घोसाळकर, सचिन पाटील, पूनम पाटील, विष्णू गुरव, सूरज अपराध यांच्या पथकाने केली. तिवडे याने अनेक नागरिकांना तडजोडीसाठी त्रास दिला होता. लोकांकडून पैसे उकळण्यासाठी त्याची एक यंत्रणा पोलिस ठाण्याबाहेर कार्यरत होती, अशी चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT