कोल्हापूर : भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील. सोबत खा. धनंजय महाडिक, मकरंद देशपांडे.  Pudhari File Photo
कोल्हापूर

विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार : मंत्री चंद्रकांत पाटील

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजपच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांच्या विभागीय बैठक

भाजपच्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांच्या विभागीय बैठकीत ते बोलत होते. येथील अयोध्या हॉटेलमध्ये बैठक झाली. मंत्री पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला यश कमी मिळाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा दोन लाख मतांनी पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील दहा जागांपैकी चार जागा महायुतीने जिंकल्या आहेत, हे महायुतीचे यश दुर्लक्षित करता येणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पूर्ण तयारीनिशी उतरणार असून, भाजपचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते ताकदीने काम करतील. राज्य अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरचे अधिवेशने घेण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.

जिल्हा कार्यकारिणीची बैठक 2, 3 व 4 ऑगस्ट रोजी

जिल्हा कार्यकारिणीची बैठक 2, 3 व 4 ऑगस्ट रोजी होईल. मंडल विस्तारित कार्यकारिणी बैठका 9, 10 व 11 ऑगस्ट रोजी होणार आहेत. कोल्हापूर शहर व कोल्हापूर पश्चिमसाठी योगेश टिळेकर, कोल्हापूर पूर्व, हातकणंगलेसाठी जगदीश मुळीक, सांगली शहरसाठी संजय बाळा भेगडे, सांगली ग्रामीणसाठी धनंजय महाडिक, सातारासाठी मुरलीधर मोहोळ यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी सर्व जिल्ह्यांतील संघटनात्मक आढावा घेतला. दक्षिण विभागप्रमुख खा. धनंजय महाडिक यांनी आगामी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT