कागल : कागल आरटीओ चेक पोस्टवर बॅरिकेडिंग लावण्याच्या कारणावरून ‘गोकुळ’चे तक्रारदार प्रकाश तुकाराम बेलवाडे यांच्यासह दोघांना शुक्रवारी दुपारी मारहाण झाली. यानंतर सोशल मीडियावर धार्मिक तणाव निर्माण करणारी पोस्ट केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्यांना बेलवाडे यांनीही धक्काबुक्की करत धमकी दिली. बेलवाडे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ समर्थक एकमेकांना भिडल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. या घटनेत दोन्हीकडील चौघेजण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयात गेलेल्या ‘गोकुळ’च्या वादाचे पर्यवसान रस्त्यावरील हाणामारीत झाल्याचे दिसले.
ही घटना समजताच दिवसभर कागल पोलिस ठाण्याच्या आवारात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मुश्रीफ समर्थक बेलवाडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. या प्रकाराने कागलमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी दिवसभर कागलमध्ये तळ ठोकून होते.
महामार्ग नाक्यावरील ठिणगीचा पोलिस ठाण्यात धुमसला वाद!
कागल येथील आरटीओ चेक पोस्ट नाक्यासमोर महामार्गावर बॅरिकेड लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत अखेर परस्परविरोधी गुन्ह्यांत रूपांतरित झाला. याप्रकरणी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, माजी उपसभापती रमेश तोडकर यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याच्या कारणावरून प्रकाश बेलवाडे यांच्यासह तिघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला असून, कागलमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते.
गोकुळ दूध संघाच्या मतदार संस्थावर आक्षेप घेणारे याचिकाकर्ते प्रदीप बेलवाडे व वैभव यादव (रा. धामणे, ता. आजरा) हे उत्तूरहून कागलच्या दिशेने जात होते. यावेळी कागल चेकपोस्ट नाक्यावर बॅरिकेडिंग काढल्याचे त्यांना दिसले. येथे अपघात झाल्याने बेलवाडे यांनी ते बॅरिकेडिंग पुन्हा लावले. त्यातून स्थानिकांशी त्यांचा वाद झाला. यानंतर हे सर्वजण आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सौरभ पाटील, शुभम घाटगे, रमेश तोडकर व त्यांच्या समवेत असणारे आठ ते दहा लोकांनी बेलवाडे यांच्यासह यादव व अरुण सोनुले यांना मारहाण केली.
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलिस ठाण्यात गेलेल्या बेलवाडे यांना पोलिस उपनिरीक्षक जमादार यांच्या कक्षात जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विकास पाटील, सौरभ पाटील, शुभम घाडगे, रमेश तोडकर व इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी ‘तुला काय लय मस्ती आली काय’ असे विचारत शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे बेलवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कागल नाक्यावर झालेल्या गोंधळानंतर बेलवाडे यानी धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करत त्याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता बेलवाडे यांच्यासह सुयोग शिंदे, दिलीप शिंदे यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीने धक्काबुक्की, शिवीगाळ करत धमकी दिल्याची फिर्याद प्रशांत गोपाळ घाटगे यांनी दिली.
पोलिस ठाण्यात दिवसभर गोंधळ
या घटनेमुळे कागल पोलिस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गेट बंद करून जमावाला बाहेर काढले. पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर आणि निरीक्षक किशोर शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांततेचे आवाहन केले. दरम्यान, या हाणामारीत प्रकाश बेलवाडे, वैभव यादव, अरुण सोनुले व प्रशांत घाटगे असे दोन्ही बाजूंचे मिळून चार जण जखमी झाले आहेत.