आशिष ल. पाटील
Ashadhi Wari आषाढी यात्रा काळात पंढरपूर मध्ये यावर्षी आरोग्य विभागाच्या वतीने गंभीर रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर 215 मोटर बाईक ॲम्ब्युलन्स ची सुविधाही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
पंढरपूर वारी आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. समाधान अवताडे, आ राजीव खरे,आ. अभिजीत पाटील, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आणि आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही एक प्रकारे ईश्वर सेवा असून ही सेवा यशस्वी पार पाडण्यासाठी भक्ती विठ्ठलाची - सेवा आरोग्याची हे ब्रीदवाक्य घेऊन आरोग्य विभागाने आपले पूर्ण योगदान द्यावे असे आवाहनही आबिटकर यांनी याप्रसंगी केले.
पालखी मार्गावर चार चाकी ऍम्ब्युलन्स न जाऊ शकणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी 215 मोटर बाईक ॲम्बुलन्स च्या माध्यमातून आरोग्य दूत वारकरी रुग्णांना थेट जागेवर जाऊन आरोग्य सेवा देतील असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय मंदिरामध्ये 24 तास आयसीयु कक्ष कार्यरत राहील अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.
पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.भगवान पवार यांनी आरोग्य विभागाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. याप्रसंगी आ. समाधान अवताडे, आ. राजीव खरे, डॉ. प्रणिता भालके यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अंदाजे तीन हजाराहून अधिक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी असे फिरते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या बैठकीस पुणे,सोलापूर आणि सातारा जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी,सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, तिन जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी,सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आभार आरोग्य विभागाच्या सह संचालक डॉ. सुनिता गोलाइत यांनी मानले. दरम्यान, ना. आबिटकर यांनी बैठकीपूर्वी सासवड,वेळापूर आणि वाखरी येथील पालखी तळाची पाहणी करून प्रशासनाला काही सूचनाही केल्या.