कोल्हापूर

Ashadhi Wari 2026: भक्ती अन् असीम श्रद्धा...; व्हीलचेअरवरून दिंडीत सहभाग घेत शियेच्या विठ्ठल भक्ताचा प्रेरणादायी प्रवास!

या अथांग जिद्दीने आणि विठूरायाच्या ध्यासाने सर्व वारकऱ्यांसमोर भक्तीचा एक सर्वोच्च आदर्श निर्माण केला आहे

पुढारी वृत्तसेवा

सुनील कांबळे

नागाव : रूप पाहतां लोचनीं । सुख जाले वो साजिणी ॥"

वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या दिशेने पडणारी पावले नसतात, तर तो अथांग भक्ती आणि प्रेमाचा एक अलौकिक सोहळा असतो. शिये ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात आज भक्तीचा अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी अध्याय पाहायला मिळाला. शारीरिक अपंगत्वावर मात करत, कोल्हापूर क्रेशर असोसिएशनचे अध्यक्ष विलास आबू पाटील यांनी व्हीलचेअरवरून तब्बल १७ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत वारीत सहभाग घेतला.

कमरेखालील भागाच्या संवेदना नसल्याने विलास पाटील हे गेल्या सात वर्षांपासून व्हीलचेअरवर आहेत. मात्र, "तुका म्हणे मना । पाईं विठ्ठलची जाणा ॥" या उक्तीप्रमाणे, शरीराला मर्यादा असल्या तरी त्यांच्या मनातील भक्तीचा प्रवाह अखंड वाहतो आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी दिंडीतील 'बोरगाव ते शेळकेवाडी' हा १७ किलोमीटरचा आव्हानात्मक टप्पा स्वतः व्हीलचेअर हाकत पार केला. त्यांच्या या अथांग जिद्दीने आणि विठूरायाच्या ध्यासाने सर्व वारकऱ्यांसमोर भक्तीचा एक सर्वोच्च आदर्श निर्माण केला आहे.

या प्रवासादरम्यान विलास पाटील यांनी शिये गावातील वारकरी बांधवांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. "माझे माहेर पंढरी । काय वाणूं या सुखाची परी ॥" असे म्हणत, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'माऊली-विठूराया'च्या जयघोषात त्यांनी ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वांची आस्थेने चौकशी केली.

जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ (हामू) पाटील यांच्यासह सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. मैलोन्‌मैल चालल्यामुळे वारकऱ्यांच्या पायांत थकवा जाणवत होता; मात्र वि विठ्ठलनामाचा गजर आणि विलास पाटील यांची जिद्द पाहून सर्वांचा थकवा क्षणात पळून गेला. 'अमृतहूनी गोड नाम तुझे देवा' असाच भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. वारीची अखंड परंपरा, गावाची एकजूट आणि पांडुरंगावरील अथांग निष्ठा कशी असावी, याचे जिवंत उदाहरणच आज विलास पाटील यांच्या रूपाने पाहायला मिळाले. विठुरायाच्या ओढीपुढे शरीराचे दुःखाश्रूही भक्तीच्या आनंदाश्रूंत बदलून गेले, असा हा भावूक क्षण ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT