प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच काळात आशाताईंचा कोल्हापुरात संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहू महाराज, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते आशाताईंचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, विनायकराव मेटे, विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक धिवरे, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.  
कोल्हापूर

Asha Bhosale award | हा तर माझ्या माहेरचा सन्मान

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते 18 वर्षांपूर्वी सत्कारप्रसंगी आशा भोसले यांचे भावोद्गार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे बालपण कोल्हापुरात गेल्याने त्यांनी नेहमीच हा ऋणानुबंध द़ृढ ठेवला. कोल्हापूरला आले की, माहेरात आले, असे त्या नेहमी म्हणायच्या. आशा भोसले यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ‘आपली आशा’ या सांगीतिक कार्यक्रमासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. याप्रसंगी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते आशा भोसले यांचा खास सत्कार करण्यात आला होता. या सत्कारानंतर भावुक झालेल्या आशाताईंच्या ओठावर आलेले शब्द होते, ‘हा तर माझ्या माहेरचा सन्मान.’

‘आपली आशा’ असे त्या कार्यक्रमाचे नाव होते. व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी आल्यानंतर आशा भोसले यांनी या कार्यक्रमाचे नाव समर्पक असल्याचे सांगितले. मी खरंच आपली आशा आहे. कोल्हापूरची आशा आहे. हे नातं कधीही संपणार नाही अशा शब्दांत आशा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले होते. सत्कारप्रसंगी मिळालेली अंबाबाईची चांदीची मूर्ती आयुष्यभर जपून ठेवेन, असे म्हणत त्यांनी आभार मानले होते.

या सत्कारप्रसंगी शाहू महाराज, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, शिवाजीराव चमकिरे, देवीचंद ओसवाल, विनायकराव मेटे, तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT