Asha bhosale | ‘माझ्या पार्श्वगायनाचा पाया कोल्हापुरातच तयार झाला’  
कोल्हापूर

Asha bhosale | ‘माझ्या पार्श्वगायनाचा पाया कोल्हापुरातच तयार झाला’

आशाताई व्यक्त करायच्या कृतज्ञ भावना; मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने कोल्हापूरकरांनी केला होता गौरव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘माझ्या पार्श्वगायनाचा पाया कोल्हापुरातच तयार झाला’ अशा कृतज्ञ भावना आशाताई नेहमीच व्यक्त करत होत्या. त्यातून कोल्हापूरविषयी असलेली त्यांची ओढ आणि जिव्हाळ्याच दिसत होता. प्रत्येक कार्यक्रमात आपुलकीची वीण घट्ट करणार्‍या आशाताईंचाही कोल्हापूरकरांनी मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरव केला होता.

आशा भोसले यांना 2002 मध्ये प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी या पुरस्काराला उत्तर देताना आशाताईंनी केलेल्या भाषणाने कोल्हापूरविषयी त्यांच्या मनात असलेले अतीव प्रेम आणि कोल्हापूरशी त्यांनी अखंडीत ठेवलेले नाते याची प्रचिती आली होती.

कोल्हापूरची लोकं उसासारखी कडक आणि तितकीच गोड

कोल्हापूरची लोक हे उसासारखे कडक आणि तितकेच गोड. त्यांची भाषा रांगडी असली, तरी ती मधासारखी गोड आहे. ही प्रेमळ भाषा मला खूप आवडते. यामुळेच माझ्या पार्श्वगायनाचा पाया कोल्हापुरात रचल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले होते.

आपला आवाज आपल्या नातवापर्यंतही पोहोचला पाहिजे, त्यासाठी मी पॉपही गाते, असे सांगतानाच त्यांनी आताची तरुण पिढी, ही पोरं कुंडीतील फुलं आहेत. त्यांना कोल्हापूरच्या लाल मातीत एकदा आणले पाहिजे. कोल्हापूरच्या वार्‍यात आस्वाद घ्यायला हवा, तरच ती खर्‍याअर्थाने फुलतील, असे सांगत कोल्हापूरविषयी असलेल्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

‘ती’ नथ आशाताईंनी जपून ठेवली होती

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आई-वडिलांचा राजर्षी शाहू महाराज यांनी सत्कार केला होता. त्यावेळी मोत्यांचा हार आणि नथ त्यांना भेट दिली होती. राजर्षी शाहूंनी दिलेली ही नथ आपल्याकडे अजूनही असल्याची आठवण आशाताई नेहमी सांगत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT