कोल्हापूर : 2010 साली विद्यापीठ हायस्कूलमध्ये आशा भोसले यांची प्रकट मुलाखत घेताना निवेदक सुधीर गाडगीळ. सोबत तत्कालीन मुख्याध्यापक प्रदीप गबाले. Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | नमस्कार मी आशा, विद्यापीठ हायस्कूलची माजी विद्यार्थिनी

शाळेला भेट दिल्यानंतर आशाताई झाल्या होत्या भावुक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूल या शाळेत आशा भोसले यांनी 1940 साली प्रवेश घेतला. पुढे आठ वर्षे त्या या शाळेत शिकल्या. दोन तासांच्यामध्ये बेंचवर ताल धरून गाण म्हणणार्‍या आशाताईंना महाजन गुरुजींचा सतत ओरडा मिळायचा. मी शाळेतील सर्वात खोडकर मुलगी होते, असं म्हणत आशा भोसले या नेहमी कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमधील शालेय आठवणींना उजाळा द्यायच्या.

मी आशा भोसले... विद्यापीठ हायस्कूलची माजी विद्यार्थिनी

1948 साली आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातील संधींसाठी मुंबई गाठली; पण तरीही विद्यापीठ हायस्कूलमधील अनेक क्षण त्यांच्या मनात कोरलेले होते. 1984 साली त्या कोल्हापुरात आल्या होत्या, तेव्हा त्या शाळेत गेल्या. मात्र, त्यावेळी नवीन शिक्षक होते. विद्यार्थी वेगळे होते. आशा भोसले शाळेत आल्या म्हटल्यावर शिक्षक, विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. तेव्हा चाळीस वर्षांपूर्वीच्या अनेक आठवणी आशाताईंनी ओठावर आणल्या. त्या पहिलीच्या वर्गात जाऊन बसल्या. हायस्कूलच्या चौकात फिरल्या, शाळेतील लाकडी खांबांवरून मायेने हात फिरवला. शाळेच्या भिंतीवर लावलेले जुने फोटो बघून आठवणीत रमल्या. आशाताईंच्या स्वागतासाठी शाळेने एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. त्यावेळी भाषणात आशाताईंचं वाक्य असं होतं...नमस्कार मी आशा भोसले, विद्यापीठ हायस्कूलची माजी विद्यार्थिनी. आजही त्यांचे ते शब्द शाळेच्या आठवणीत कैद आहेत.

हृदयनाथांसाठी आशाताईंचा वाद

लता मंगेशकर यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडल्याने त्यांचे शिक्षण थांबले. मात्र, त्यांनी भावंडांना कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. आशा भोसले या शाळेत जाऊ लागल्या. पाठोपाठ हृदयनाथ यांनीही शाळेत प्रवेश घेतला. आशाताईंचे लहान भावाकडे सतत लक्ष असायचे. दरम्यान, घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे हृदयनाथ यांची शाळेची फी थकली होती. शिक्षकांनी लता मंगेशकर यांना शाळेत बोलवून फी भरा नाहीतर हृदयनाथ यांना शाळेत बसता येणार नाही, असे सांगितले. आशा भोसले यांनी हा संवाद ऐकला. फी भरली नाही म्हणून माझ्या भावाला शाळेत घेत नाही हे काही बरोबर नाही, असं म्हणत त्यांनी थेट शिक्षकांशीच वाद घातला. अखेर लताबाईंनी आशाताईंना शांत केले. दोन दिवसांनी फी भरली, तेव्हा कुठे आशाताईंचा राग निवळला.

शाळेतल्या चौकात म्हटली 20 गाणी

9 फेब—ुवारी 2010 या दिवशी एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने आशा भोसले कोल्हापुरात आल्या होत्या. हे निमित्त साधून विद्यापीठ हायस्कूल व्यवस्थापनाने त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले. वयाच्या आठव्या वर्षी ज्या शाळेत प्रवेश घेतला, त्याच शाळेच्या मंचावर यशस्वी गायिका म्हणून विराजमान झालेल्या आशा भोसले या पुन्हा एकदा शालेय वयात पोहोचल्या. शिक्षकांच्या आठवणी त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर शाळेच्या मुख्य चौकात 20 गाणी म्हणत त्यांनी सुरेल आनंद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT