कोल्हापूर : कोल्हापूरच्या जनतेला भेडसावणारा कोणताही प्रश्न असो, मग तो टोलचा लढा असो की, शेतकर्यांची आंदोलने, तो सोडवण्यात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व ठरणारी सर्किट बेंचची मंजुरी हे त्यांच्याच अथक पाठपुराव्यांचे फळ आहे, अशा शब्दांत अॅड एजन्सीज अँड मीडिया असोसिएशनच्या वतीने डॉ. जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सर्किट बेंचच्या मंजुरीबद्दल ‘आस्मा’च्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. जाधव यांनी कोल्हापूरसाठी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होणे हे तब्बल पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाचे आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या लढ्याची सुरुवात ‘पुढारी’ने केली आणि कोल्हापूरच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष यापुढेही तितक्याच ताकदीने सुरू राहील, अशी ग्वाही दिली.
डॉ. जाधव म्हणाले, शाहू जन्मशताब्दी आणि छत्रपती शिवाजी महाराज त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि अनेक नेते उपस्थित होते. त्याच व्यासपीठावर शरद पवार यांनी ‘कोल्हापूरला खंडपीठ कशाला पाहिजे?’ असा प्रश्न केला होता. मात्र, त्या विरोधानंतरही पन्नास वर्षांच्या अथक संघर्षातून आणि सर्वांच्या सहकार्यातून आज हे यश मिळाले आहे. हे यश सर्वांचे आहे. अनेक सरन्यायाधीशांकडे सातत्याने पाठपुरावा केला, अखेर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश झाल्यानंतर हा विषय मार्गी लावला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘आस्मा’चे अध्यक्ष अमरदीप पाटील, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, सुनील बासरानी, राजाराम शिंदे, अभय मिराशी, सलीम देवळे, अमरसिंह भोसले, सुनील बनगे, संजय रणदिवे, किरण वडगावे, प्रशांत बुचडे, जगदीश शहा, ‘फेम’चे खजिनदार कौस्तुभ नाबर, विवेक मंद्रुपकर, प्रशांत कुलकर्णी, अविनाश पेंढुरकर आदी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, 1974 मध्ये आम्ही ‘पुढारी’त खंडपीठाच्या मागणीसाठी पहिला अग्रलेख लिहिला. त्यावेळी कोल्हापूरला खंडपीठ हवे, ही संकल्पना राज्यकर्त्यांच्या विचारातही नव्हती. या अग्रलेखानंतर आम्ही केवळ मागणी करून थांबलो नाही, खंडपीठाच्या जनजागृतीसाठी कराड, सांगली, सातारा येथे परिषदा घेऊन जनमत तयार केले.