धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर गेल्याने महायुतीमधील घटक पक्षांकडे ठरावांचे वजन कोणाकडे जास्त आणि त्यामधून मोठा भाऊ कोण, यावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विशेषत: मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक मोठ्या भावावर दावा करत असताना गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी थेट बापच दाखवून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याची नेतेमंडळी कशी दखल घेणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल.
गोकुळ निवडणुकीसाठी पात्र दूध संस्थांकडून ठराव दाखल करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये सर्वाधिक ठराव असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असणार असे जाहीर केले, तर भाजपच्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल, असे स्पष्ट केले. मोठ्या भावावरून सुरू असणारा हा वाद डोंगळे यांनी थेट बापापर्यंतच पोहोचविला. त्यांच्या या वक्तव्याची जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू होती.
डोंगळे-आबाजींचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न
गोकुळच्या निवडणुकीत विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची भूमिका निर्णायक ठरते. मागील निवडणुकीत त्यांनी माजी आ. महादेवराव महाडिक, स्व. आ. पी. एन. पाटील यांच्या पॅनेलला सोडचिठ्ठी दिली. आ. सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये दाखल होत त्यांचे पॅनेल विजयी करत वजन सिद्ध केले; मात्र यंदा निवडणूक पक्षीय पातळीवर गेली असल्याने महायुतीमधील काही नेत्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत आहे. त्यामुळे डोंगळे यांनी बुधवारी (दि. १) आम्ही दोघे जिकडे तिकडचे पॅनेल विजयी होते, असे वक्तव्य करत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले, की नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला, अशी चर्चा सुरू होती.