गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळे  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Gokul Election | डोंगळे म्‍हणाले, ‘गोकुळ’चा बाप आबाजी, आबाजी म्‍हणतात, आवळी-जावळी असतील

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : महायुतीमध्‍ये मोठ्या भावावरून सुरू असलेल्‍या वादाला ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चा बाप आबाजी आहेत. भाऊ काय करायचा, आम्‍हाला बाप महत्त्‍वाचा अशा शब्‍दांत उत्तर दिले. तसेच, आम्‍ही दोघे जिकडे, विजय निश्‍चित तिकडे, असेही त्‍यांनी सांगितले.

सहायक निबंधक कार्यालयात बुधवारी (दि. १) ज्‍येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, माजी चेअरमन नविद मुश्रीफ, अजित नरके, बाबासाहेब खाडे आदी संचालक ठराव दाखल करण्‍यासाठी आले होते. यावेळी प्रसार माध्‍यमांशी बोलताना मोठ्या भावावरून टोलेबाजी रंगली. डोंगळे म्‍हणाले, आबाजी मला पाच वर्ष सिनिअर आहेत. माझी ‘गोकुळ’मध्‍ये ३८ वर्ष झाली. दूध उत्‍पादक शेतकर्‍यांचा विकासच आमच्‍यात भिनला आहे. आबाजींचे वय ७७ आहे. त्‍यामुळे ते ‘गोकुळ’मधील बाप आहेत. लहान-मोठ्या भावांना ते सोबत घेऊन जातील, असा टोला त्यांनी लगावला.

आवळी-जावळी असतील

खा. धनंजय महाडिक भाजपच, तर मंत्री हसन मुश्रीफ राष्‍ट्रवादी मोठा भाऊ असल्‍याचे सांगतात. याबाबत ज्‍येष्‍ठ संचालक पाटील यांना विचारले असता, त्‍यांनी आवळी-जावळी असतील, अशा शेलक्‍या शब्‍दांत उत्तर दिले.

चार हजार ठराव; इथेच निकाल स्‍पष्‍ट : नविद मुश्रीफ

निवडणुकीसंदर्भात बोलताना माजी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी महायुतीकडे ४ हजार ठराव आहेत. त्‍यामुळे ‘गोकुळ’चा निकाल इथेच स्‍पष्‍ट होत असल्‍याचे सांगितले.

काँग्रेसमध्‍ये असताना दिल्‍लीपर्यंत गेलो

महायुतीचा मोठा भाऊ मुंबईतून देवाभाऊ ठरवणार, असे जे नेते म्‍हणातात त्‍यांच्‍या काँग्रेस पक्षाचा मी देखील सदस्‍य होतो. काँग्रेसमध्‍ये असताना एका निर्णयासाठी आम्‍ही दिल्‍लीपर्यंत गेलो होतो. त्‍यामुळे त्‍यांनी असे वक्‍तव्‍य करणे बरोबर नाही, असे प्रत्‍युत्तर डोंगळे यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता दिले.

तोडकं-मोडकं पॅनेल होईल

‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध होणार नाही. निवडणुकीत महायुतीचे पॅनेल मजबूत होईल. विरोधात तोडकं-मोडकं पॅनेल होईल पण निवडणूक होणार, असेही यावेळी डोंगळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT