kolhapur | आबिटकरांना शह, महाडिकांना रोखले (Pudhari Photo)
कोल्हापूर

kolhapur | आबिटकरांना शह, महाडिकांना रोखले

अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मुश्रीफ यांनी केली ‘गोकुळ’ची जोडणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेची बाजू जिल्ह्यात भक्कमपणे लावून धरणारे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये आपली बाजू भक्कम केली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शह देत महाडिक गटालाही रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या राजकारणात पक्ष प्रवेशाचे सोहळे होत आहेत. करवीरमध्ये काँग्रेसचे मातब्बर घराणे असलेल्या पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देऊन मुश्रीफ यांनी करवीरमध्ये राष्ट्रवादीची पेरणी केली आहे. त्या पाठोपाठ गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनाही पक्षात प्रवेश देऊन राधानगरी- भुदरगडमध्ये पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांना शह दिला आहे. याचवेळी राधानगरीतील गोकुळचे मोठ्या संख्येने ठराव असलेले डोंगळे यांना सोबत घेत महाडिक गटालाही रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बँक आणि गोकुळ यांना कमालीचे महत्त्व आहे. या दोन्ही संस्थांच्या निवडणुका वर्षभरात होत आहेत. त्यासाठी नेत्यांनी जोरदारपणे तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नेत्यांची आणि त्या माध्यमातून पक्षाची बाजू भक्कम केली जात आहे.

गोकुळमध्ये चार वर्षांपूर्वी सत्तांतर झाले. त्यामध्ये हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, के. पी. पाटील, प्रकाश आबिटकर आदींचा वाटा होता. मात्र राज्यातील सत्तांतराने जिल्ह्यातही राजकीय सत्तांतर झाले. त्याची सुरुवात अरुण डोंगळे यांनी केली. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक येणार असेल तरच आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका डोंगळे यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला महत्त्व येण्याचे कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिंदे शिवसेनेची बाजू त्यांनी जिल्ह्यात लावून धरली होती. त्याचा परिणाम दिसून आला आणि बाबासाहेब चौगले व शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आघाडीने निश्चित करूनही ऐनवेळी तडजोडीचे उमेदवार म्हणून नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकला. तरीही गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारात पक्ष नसतो हे अधोरेखित झाले आणि महाडिक गट एकाकी पडल्याचे जाणवले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. पी. एन. पाटील गटाकडे ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात दूध संस्थांचे ठराव आहेत, तीच अवस्था किंवा जास्त प्रमाणात ठराव अरुण डोंगळे यांच्याकडे आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांचा अजित पवार राष्ट्रवादीतील प्रवेश हा पक्षाला ताकद देणारा, जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांना शक्ती देणारा आणि गोकुळच्या जोडण्या यशस्वी करणारा ठरणार आहे. डोंगळे यांनी अधिकृत प्रवेश केल्यामुळे ठराव घेऊन त्यांना आता मुश्रीफ यांच्याकडे जावे लागेल. त्यामुळे महाडिक यांना येथे रोखण्याची मुश्रीफ यांची चाल आहे तर के. पी. पाटील यांच्या पाठोपाठ डोंगळे यांचा हा प्रवेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शह देणारा आहे.

गोकुळच्या 600 वर ठरावांची बेगमी

राहुल पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रवेशाने किमान 600 ते 650 दूध संस्थांचे ठराव या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ठरावाची बेगमी गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ यांना फायदेशीर ठरणार आहे.

दोन-तीन तालुक्यांत मोहरे हेरलेत

ठाकरे शिवसेनेकडून राधानगरी-भुदरगडमधून विधानसभा निवडणूक लढविलेले के. पी. पाटील अजित पवार राष्ट्रवादीत आहेत. त्यापाठोपाठ आता अरुण डोंगळे यांचाही प्रवेश झाला आहे. त्यामुळे करवीर पाठोपाठ राधानगरीतही राष्ट्रवादीला नवे नेतृत्व मिळाले आहे. अजून दोन ते तीन तालुक्यांत आपली वजाबाकी आहे. मोहरे हेरून ठेवले आहेत. वेध धरला आहे. आपला नेम चुकेल असे वाटत नाही, असे हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी केलेले भाषण त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा दाखविणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT