Gokul Election | १५०० संस्थांचा पत्ता कट होणार; संस्था प्रतिनिधी कोर्टात जाणार? 
कोल्हापूर

Gokul Election | १५०० संस्थांचा पत्ता कट होणार; संस्था प्रतिनिधी कोर्टात जाणार?

मतदार यादीमध्‍ये सुमारे ३८०० मतदार राहण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाच्‍या अंतिम मतदार यादीतून सुमारे १५०० दूध संस्‍थांचा पत्ता कट होण्याची शक्‍यता आहे. यादीत साधारणत: ३८०० मतदार राहतील, असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. मतदार यादीतून वगळले जाणार याचा अंदाज आल्‍याने संस्‍था प्रतिनिधींनी न्‍यायालयात धाव घेण्‍याची आताच तयारी केली आहे. त्‍यामुळे गोकुळची अंतिम मतदार यादीही न्‍यायालयीन कचाट्यात सापडणार आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी ४८९७ संस्‍था सभासदांची मतदार यादी दुग्‍ध विभागाने प्रसिद्ध केली. यानंतर अवसायनातील ४९२ संस्‍थांचा अवसायनाचा आदेश न्‍यायालय व विभागीय उपनिबंधक कार्यालयाने रद्द ठरविल्‍याने त्‍यांचाही यादीमध्‍ये समावेश झाला. त्‍यामुळे सध्‍याच्‍या यादीत ५३८९ मतदार आहेत. प्रारूप यादीवर ५९५ हरकतींमधून सुमारे १७०० संस्‍थांवर आक्षेप घेण्‍यात आला आहे. हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून ३१ ऑगस्‍टपर्यंत जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांना निकाल द्यावा लागणार आहे.

हरकत घेतलेल्‍या संस्‍थांचे निकालाकडे लक्ष

हरकत घेतलेल्‍या १७०० दूध संस्‍थांचे आता विभागीय उपनिबंधक काय निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे. हरकत घेतलेल्‍या संस्‍थांपैकी सुमारे १३०० ते १५०० संस्‍था मतदानास अपात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. तसा अंदाज दूध संस्‍था प्रतिनिधींमधून मांडला जात आहे. संस्‍था अपात्र ठरल्‍यास प्रसंगी त्‍यांनी न्‍यायालयात धाव घेण्‍याचीही तयारी ठेवली आहे. ­

चौकशी, सुनावणीला प्रतिनिधी वैतागले

सहा महिने सुरू असलेल्‍या सततच्‍या चौकशी, सुनावणीला संस्‍था प्रतिनिधी वैतागले आहेत. चौकशी, सुनावणीची नोटीस आली की संस्‍थेची कागदपत्रे घ्‍यायची आणि कोल्‍हापूरसह पुणे, मुंबई गाठायची हा एकच कार्यक्रम त्‍यांचा सुरू आहे. फेर्‍या मारून संस्‍था प्रतिनिधी आता संतापले आहेत. आम्‍हाला मतदानाचा अधिकारच नको; पण हा चौकशीचा ससेमिरा थांबवा, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT