कोल्हापूर : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने कनाननगरातील तीन घरांवर सशस्त्र हल्ला केला. तलवार, एडका, लोखंडी रॉडच्या सहाय्याने घरातील प्रापंचिक साहित्य, दुचाकीची तोडफोड केली. टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात अनिकेत विनोद कांबळे गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी मनीषा विनोद कांबळे (वय 32, रा. सावंत गल्ली, कनाननगर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वृषभ गायकवाड, अनिकेत शिंदे, अजय चव्हाण, गणेश ऊर्फ संदेश घोलप, रोहित एराळे, मलिक कांबळे, अनुराग शिंदे, ओंकार पाटील, हर्षद संकपाळ (सर्व रा. कनाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मनीषा कांबळे यांच्या शेजारी राहणार्या गौरव भालेराव याचा अजय चव्हाण, अनिकेत शिंदेसोबत दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून गौरवला या दोघांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गौरवने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून हा हल्ला झाला. ही घटना पाहून घाबरलेला अनिकेत कांबळे घरी पळून जात होता. संशयितांनी त्यास शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. वृषभ गायकवाड याने अनिकेतच्या पाठीवर चाकूने वार केला. मनीषा कांबळे यांनी अनिकेतची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत सीपीआरमध्ये दाखल केले. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.