संदीप बिडकर
इचलकरंजी : स्त्रीभ्रूण हत्येसाठी वापरली जाणारी अनेक बेकायदेशीर औषधे ही ऑनलाईनच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या मागवली जातात. त्याचबरोबर डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रीप्शनशिवाय अशा औषधांची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित असतानाही अनधिकृत वेबसाईट, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण ही औषधे मागवून त्याचा स्त्रीभ्रूण हत्येसाठी सर्रास वापर होत आहे. शासनाच्या वतीने ‘एआय’च्या आधारे राष्ट्रीय डिजिटल देखरेख प्रणाली विकसित करून अशा औषध पुरवठा करणार्या कंपन्या, संशयास्पद जाहिराती, उत्पादन सुची, व्हिडीओ अन्य रिल्स स्वयंचलितपणे शोधून त्यांचे पुनरावलोकन करून त्यांच्यावर बंधन घालावे, अशी मागणी आता समोर येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्येचा विषय समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील डॉ. गायकवाड यांच्या माध्यमातून मोठे रॅकेट उघडकीस आले. परंतु असे अनेक प्रकार जिल्ह्यात व राज्यात सर्रास चालू आहेत. या सर्वांना बेकायदेशीर औषधे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ऑनलाईन आहे. अशा औषधांची विक्री व प्रचार तसेच खरेदीसाठी प्रवृत्त करणार्या रिल्स, व्हिडीओ हेही कारणीभूत आहेत. अशी माहिती निर्माण करणारे इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट निर्माते यांच्यावर संबंधित खात्याने आर्थिक दंड तसेच फौजदारी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑनलाईन फार्मसीला शासनाच्या वतीने परवानगीबाबत नियम व अटी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु याचाच फायदा घेत ऑनलाईन औषध विक्रेत्यांनी स्त्रीभ्रूण हत्येसाठी वापरल्या जाणार्या मशिनरीपासून सर्व औषधांची सर्रास विक्री सुरू केली आहे. त्याच्यावर शासनाच्या वतीने ‘एआय’च्या आधारे व सायबर सेलच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करून अशा औषध विक्री करणार्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मेडिकल क्षेत्रातून समोर येत आहे.
जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येची होणारी संख्या पाहता धक्कादायक आहे. यासाठी वापरण्यात येणारी औषधे ही निश्चितपणे ऑनलाईन खरेदी केली जातात. सामान्य फार्मासिस्ट डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध देत नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन औषधांवर कडक कारवाई करावी.अभिजित हेरवाडे, फार्मासिस्ट, औषध उद्योग अभ्यासक