Bharatiya Janata Party | भाजपची घोडदौड (Pudhari File Photo)
कोल्हापूर

Bharatiya Janata Party | भाजपची घोडदौड

पुढारी वृत्तसेवा

सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन. 1980 रोजी याच दिवशी मुंबईत पक्षाची स्थापना झाली. आजवरच्या 46 वर्षांच्या वाटचालीत पक्षाने राजकीय पटलावर केलेली प्रगती उल्लेखनीय तर आहेच, पर्यायी राजकारणाचे लक्ष्य साध्य करत काँग्रेसचा एकछत्री कारभार दूर करण्यात पक्षाला आलेले यश ही ठळक बाब. हा देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला. अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा या पक्षाची सदस्य संख्या मोठी आहे. केंद्रात सलग तीन वेळा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या संजीवनीने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्षाने झेप घेतली. आज देशात पक्षाचे सर्वाधिक मुख्यमंत्री आहेत आणि अन्य कोणत्याही पक्षापेक्षा सर्वात जास्त राज्यांची सत्ता पक्षाकडे आहे. पूर्वी प्रत्येक गावात काँग्रेसचा झेंडा व काँग्रेसचा कार्यकर्ता असायचा. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ही बाब अभिमानाने सांगत. आता काँग्रेसचा कार्यकर्ता गावात शोधावा लागतो.

निवडणुकीत मोठ्या शहरातही काँग्रेसच्या बूथवर कार्यकर्ते दिसत नाहीत. ज्या वेगाने भाजपचा विस्तार झाला त्याच वेगाने काँग्रेस संकुचित होत गेली. काळानुसार भाजप बदलत राहिला. संघटना बांधणीवर पक्ष नेत्यांनी नेहमीच जोर दिला. पक्षाचा कार्यकर्ता व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फौज हा पक्ष विस्ताराचा मोठा आधार राहिला. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे पक्षाने गेल्या बारा वर्षांत उत्तुंग यश मिळवले. पक्षाचा प्रगतीचा आलेख सतत उंचीवर जात आहे. निर्माण केलेले विक्रम पक्ष स्वत:च मोडत आहे. केंद्रात व विविध राज्यांत सत्ता संपादन केली. प्रत्येक निवडणुकीत यश मिळवले; पण भाजप नेतृत्वाने जनतेशी नाळ कधी तुटू दिली नाही. समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी सत्तेवर असताना काम करायचे आणि जनसंपर्क मजबूत ठेवायचा, या दोन्ही आघाड्यांवर कटाक्ष राहिला.

लोकांनी दिलेला विश्वास सर्वात महत्त्वाचा मानत त्याला तडा जाऊ देता कामा नये, याची दक्षता घेतल्यानेच निवडणुकीत जनता या पक्षाकडे पुन्हा सत्ता सोपवताना दिसते. मुंबईत जेव्हा स्थापना झाली तेव्हा काँग्रेससह कोणत्याही राजकीय पक्षाने वा त्यांच्या नेत्यांनी भाजप भविष्यात आपल्याला नेस्तनाबूत करेल अशी किंचितही कल्पना केली नव्हती. सहा एप्रिल हा दिवस भारतीय राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. मजबूत संघटन, हिंदुत्ववादी विचारधारा आणि ताकदवान दूरद़ृष्टी असलेले नेतृत्व या आधारावर पक्षाने मोठी झेप घेतली. राष्ट्रीय किंवा प्रदेशाचे अध्यक्ष घराणेशाही चालविणारे निवडले गेले नाहीत. पक्षाच्या नेतृत्वावर एकाच घराण्याची मक्तेदारी आवजर दिसली नाही. पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा आधार आहे आणि संघ भावनेला महत्त्व आहे. भाजपचा उदय हा भारतीय जनसंघाच्या विचारसणीतून झाला. जे जनसंघात होते, तेच भाजपात आले आणि आहेत. भाजपने 1984 मध्ये पहिली निवडणूक लढवली; पण त्या निवडणुकीत केवळ दोनच खासदार निवडून आले. त्या काळात देशावर काँग्रेसचे वर्चस्व होते. डावे किंवा समाजवादी पक्ष भाजपला जवळ करीत नव्हते. सुरुवातीला गांधीवादी समाजवाद ही विचारसरणी पक्षाने पत्करली; पण त्याला जनतेने फारसा प्रतिसाद दिला नाही. देशभर काँग्रेसची पाळेमुळे रुजली असल्याने व वर्षानुवर्षे काँग्रेस पक्ष सत्तेवर असल्याने भाजपला आपले स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या राम रथयात्रेमुळे पक्षाची उत्तर भारतात हिंदी भाषिक प्रदेशात विलक्षण लोकप्रियता वाढली. पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी हे सर्वमान्य नेते होते. त्यांची प्रतिमा समन्वयवादी होती. 1996 मधे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली व वाजपेयी पंतप्रधान झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हे दोनच मित्र पक्ष तेव्हा पक्षाकडे होते. बहुमताची संख्या गाठता न आल्याने वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील हे पहिले सरकार तेरा दिवसांत कोसळले; पण या अपयशातूनच पक्षाची प्रगती सुरू झाली. 1998 व 1999 मधे केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळाले व वाजपेयी पंतप्रधान झाले. 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार आले.

2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भाजपला पुन्हा यशाच्या शिखराकडे नेले. 2014, 2019 व 2024 अशा लागोपाठ तिन्ही निवडणुकांत विजय मिळवून मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले. पक्षाच्या 46 वर्षांच्या वाटचालीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णर्मू्ती, एम. वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. आता नितीन नवीन यांच्याकडे ती जबाबदारी आहे. योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र) यांच्यासह भाजपच्या डझनभर मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात पक्ष मजबूत केला. पक्षाच्या या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामागे केवळ संघटन शक्ती नाही, तर बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली; मात्र सातत्याने मिळणारे यश टिकवून ठेवणे हीच खरी कसोटी असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान अधिक मोठे होत आहे. विरोधकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेत पुढे जाणार्‍या भाजपसमोर सक्षम पर्याय उभा राहिल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे आगामी काळात केवळ विस्तारावर नाही, तर सुशासन आणि विश्वास टिकवण्यावर पक्षाची वाटचाल अवलंबून असेल. याचबरोबर देशातील विविध सामाजिक, आर्थिक प्रश्नांना प्रभावीपणे हाताळताना समाजातील सर्वच घटक विशेषत: तळातील सर्वसामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आव्हान असेल. तेच पक्षाच्या दीर्घकालीन यशासाठी निर्णायक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT