Approval of District Level Committee to Shri Kshetra Jotiba Authority
श्रीक्षेत्र जोतिबा मंदीर Pudhari File Photo
कोल्हापूर

‘श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणा’ला जिल्हास्तरीय समितीची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणाच्या 1,816 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला सादरीकरणानंतर शनिवारी (दि. 6) जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली. हा आराखडा आता राज्याच्या उच्चाधिकार समितीला सोमवारी सादर केला जाणार आहे. जोतिबा देवस्थानसह प्राधिकरणात येणार्‍या 23 गावांचा विकास साधा, अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दरम्यान, शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 390 कोटींचा निधी महिन्याभरात उपलब्ध होईल, असे आ. विनय कोरे यांनी सांगितले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान आणि परिसरातील 23 गावांच्या प्राधिकरणाचा यापूर्वी 1,530 कोटींचा आराखडा शासनाला सादर केला होता. त्यात सुधारणा करून 1,816 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देत तो शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुश्रीफ म्हणाले, आराखडा तयार करताना घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक पद्धतीवर भर द्या, परिसरातील गावांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, गावातील उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, याचा विचार करा. डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करून प्राणिसंग्रहालय तयार करता येईल का? याचीही चाचपणी करा, अशी सूचना खा. धनंजय महाडिक यांनी केली. अर्पण केलेल्या नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करून बचत गटांसाठी रोजगारनिर्मितीचा विचार करा, असे खा. धैर्यशील माने यांनी सांगितले.

यावेळी आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, रोहित तोंदले आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT