Kolhapur Circuit Bench | कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील, याचिका दाखल करता येणार Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench | कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील, याचिका दाखल करता येणार

कामकाजासाठी ‘बॉम्बे उच्च न्यायालय अपील बाजू (सुधारणा) नियम, 2025’

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील सर्व अपील, अर्ज, याचिका कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये सादर करता येणार आहेत. त्याचा निर्णयही येथेच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालय ‘बॉम्बे उच्च न्यायालय अपील बाजू (सुधारणा) नियम, 2025’ लागू केला जाणार आहे. त्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाले आहे. येत्या दि. 18 ऑगस्टपासून त्याचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. याकरिता प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सर्किट बेंच सुरू करण्यात येत असल्याबाबतची अधिसूचना दि. 1 ऑगस्ट रोजी काढण्यात आली. यानंतर सर्किट बेंचच्या कामकाजाची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी गतीने काम सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय कामकाज ‘बॉम्बे उच्च न्यायालय (अपील बाजू) नियम, 1960’नुसार चालते. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी ‘बॉम्बे उच्च न्यायालय अपील बाजू (सुधारणा) नियम, 2025’ तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कामकाजाची रूपरेषा जवळपास स्पष्ट करण्यात आली आहे. या नियमाची नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबाबत दि. 5 ऑगस्टपर्यंत हरकत अथवा सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. हे नियम मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अधिसूचनेद्वारे ज्या तारखेला लागू करतील, त्या दिवसापासून लागू होणार असून, वेगवेगळ्या तरतुदींसाठी वेगवेगळ्या तारखा लागू केल्या जाऊ शकतात, असेही या नियमांत म्हटले आहे.

जे वकील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पणजी किंवा कोल्हापूरमध्ये वास्तव्य करत नाहीत किंवा कार्यालय नाही, त्यांनी तिथल्या उच्च न्यायालयातील मान्यताप्राप्त लिपिकाची नेमणूक करावी. अशा लिपिकावर केलेली सेवा वकिलावर सेवा झाल्यासारखी ग्राह्य धरली जाणार आहे. सार्वजनिक अधिकारी जर मुंबई, नागपूर, औरंगाबाद किंवा कोल्हापूर शहरांत कार्यरत असतील, तर अशा अधिकार्‍याला नोटीस देताना त्याच्या कार्यालयातील सुपरिटेंडंट किंवा हेड क्लार्क दर्जाच्या कर्मचार्‍याला ती दिली जाऊ शकते, असे या नियमांत म्हटले आहे. ‘कोर्ट हाऊस’ म्हणजे मुंबईसाठी उच्च न्यायालयाचे मुंबईतील मुख्य कोर्ट हाऊस आणि नागपूर, औरंगाबाद, पणजीसाठी अनुक्रमे तेथील खंडपीठांचे, तर कोल्हापूरसाठी सर्किट बेंचचे कोर्ट हाऊस असे राहील, असेही या नियमात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाची तयारी युद्धपातळीवर

दरम्यान, दि. 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचचे काम सुरू होणार आहे. या कालावधीत सर्किट बेंच इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सीपीआरसमोरील जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा संपूर्ण कायापालट केला जात आहे. या इमारतीत तीन कोर्ट रूम तयार केले जात आहेत, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दोन-तीन दिवसांत या तिन्ही कोर्ट रूम सुसज्ज होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासह आवश्यक अन्य सर्व कामे दि. 10 ऑगस्टपर्यंत पूर्णत्वाला जातील, अशीही शक्यता आहे. यानंतर उच्च न्यायालयाकडून मुंबईतील दफ्तर कोल्हापुरात आणण्याचे काम सुरू होईल, अशीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT