Hajgoli MD Drug Case | ग्रॅममधील विक्रीला किलोची हाव, 'अमली'च्‍या धंद्याला कोटींचा भाव 
कोल्हापूर

Hajgoli MD Drug Case | ग्रॅममधील विक्रीला किलोची हाव, 'अमली'च्‍या धंद्याला कोटींचा भाव

चिरीमिरीत मिळणार्‍या अमली पदार्थांच्‍या निर्मितीचा आता कारखानाच

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : अमली पदार्थांच्या काळ्या धंद्याने आता किरकोळ विक्रीची पातळी ओलांडून थेट किलोच्या व्यवहारापर्यंत मजल मारल्याचे धक्कादायक वास्तव चंदगड तालुक्यातील कारवाईतून समोर आले आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने हाजगोळी येथील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून कारवाईत तब्बल १ कोटी ९१ लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केला. विशेष म्हणजे, कोल्हापुरातून महाराष्ट्रासह परराज्यात अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचा संशय असल्याने या कारवाईने ड्रग्जच्या काळ्या साम्राज्याची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, याची गंभीर जाणीव करून दिली आहे.

कोटीचा कच्चा माल... कोट्यवधीचा फायदा

अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा मोठा साठा कारखान्यात करण्यात आला होता. कमी किमतीच्या कच्च्या मालातून एमडी तयार करून त्याची बाजारात मोठ्या दराने विक्री करण्याचा डाव होता. तब्बल ५० ते ६० किलो एमडी तयार करण्याची तयारी होती. म्हणजेच ग्रॅमच्या पुड्यांपासून सुरू झालेला हा धंदा थेट किलोच्या उत्पादनापर्यंत पोहोचल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. जिल्ह्यात चिरीमिरीत मिळणार्‍या अमली पदार्थांची आता निर्मिती होत असल्याने सप्लाय चेन कोल्हापुरातूनच जात असल्याचे समोर आले आहे.

कोल्हापुरातून कर्नाटक, गोव्यापर्यंत जाळे

अमली पदार्थांची विक्री केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून कर्नाटक आणि गोवा राज्यातही पुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यामागील संपूर्ण नेटवर्क शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कमी वेळेत कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी या धंद्यात मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जात आहे; मात्र तरुणाई व्यसनाच्या गर्तेत ढकलली जात आहे.

टास्क फोर्सची धडक कारवाई

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणेचे पोलीस अधीक्षक महम्मद मकानदार, अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. वेळीच कारवाई केल्याने एमडीनिर्मितीचा मोठा डाव उधळला. आता या कारखान्यामागील सूत्रधार, गुंतवणूकदार, पुरवठादार आणि विक्रीचे नेटवर्क शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT