कोल्हापूर

सावधान! बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत ओळख दर्शवाल तर!

विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर; जिल्हा, तालुकास्तरावर विशेष भरारी व बैठी पथके

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विभागीय मंडळाने परीक्षार्थींना गंभीर इशारा दिला आहे. ‘उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शवणे हा गंभीर गैरमार्ग असून, असे आढळल्यास संबंधित विषयाची संपादनूक रद्द करून विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाईल,’ असा इशारा विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. यासंदर्भात मंडळाने व्हिडीओ संदेशाद्वारे राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे. राज्य मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेवर विशिष्ट ठिकाणी बैठक क्रमांक लिहिण्याव्यतिरिक्त इतर कुठेही स्वतःची ओळख पटेल असे लिखाण करणे हा गुन्हा मानला जातो. यात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा शाळेचे, गावाचे नाव लिहिणे, धार्मिक चिन्हे, विशिष्ट रेखाचित्रे, कोड किंवा गुप्त संदेश लिहिणे, उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पृष्ठावर ठरलेल्या जागेशिवाय अन्यत्र कुठेही बैठक क्रमांक लिहिणे, परीक्षकाला उद्देशून विनंती करणे, पास करण्याची याचना करणे, शुभेच्छा देणे किंवा प्रार्थना लिहिणे यांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे संबंधित विद्यार्थ्यावर ‘शिक्षासूची’नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाने गेल्या दोन वर्षांत कॉपीचे प्रमाण जवळपास शून्यावर आणले आहे. हे यश टिकवण्यासाठी यंदाही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची निगराणी सुरू आहे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा व तालुका स्तरावर विशेष भरारी व बैठी पथके तैनात आहेत.

सायबर कारवाई आणि कायदेशीर दंड

डिजिटल युगात प्रश्नपत्रिका लीक करणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रसारित करणे यावर मंडळाचे विशेष लक्ष आहे. अशा प्रकरणांत सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच, लाच देणे किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत फौजदारी गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे विभागीय मंडळाचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT