कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी येथे पाच वर्षांच्या मुलीला तापलेल्या उलथनीचे चटके देऊन गंभीर जखमी करणाऱ्या सावत्र आईच्या घरावर संतप्त महिलांनी आज (दि. १४) मोर्चा काढला. महिलेला अटक केल्यानंतर आज कोर्टाने तिची जामीनावर सुटका केली होती. ती महिला दुपारी घरी आल्याची माहिती महिलांना मिळाली होती. त्यामुळे जमावाने तिला का सोडली म्हणून तिच्या घरावर मोर्चा काढला. (Kolhapur News)
यावेळी रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख डॉ. प्रगती चव्हाण यांच्यासह महिलांचा जमाव पूजा मगरे यांच्या घरच्या दिशेने आला. त्यांनी तिचा पती शुभम मगरे याला मारहाण केली. दारात आलेल्या जमाव पाहून पूजा पाठीमागच्या दरवाजातून पसार झाली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. तिला कठोर शासन करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली. (Kolhapur News)
शुक्रवारी कासारवाडी येथे राहणाऱ्या शुभम मगरे व पूजा मगरे (मुळ गाव शहापूर, ता. अंबड, जि. जालना) या कुटुंबातील पाच वर्षाच्या राणी हिला अंथरुणात लघुशंका केली म्हणून सावत्र आई पूजाने गालावर व शरीरावर गरम उलथनीने चटके दिल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली होती. पूजा मगरे हिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तिला आज जामीन देण्यात आला.