कोल्हापूर : सदस्य ठरावावरून सभेत महायुतीचे नगरसेवक आणि काँग्रेस नगरसेवकांत जोरदार शाब्दिक वादावादी सुरू होती.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Kolhapur Water Crisis | टँकरचे नियोजन का केले नाही, महापालिकेला भीक लागली का?

संतप्त नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर; पाणीप्रश्‍नी महासभेत रणकंदन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभर पाणीबाणी असूनही टँकरचे नियोजन केलेले नाही. महापालिकेला भीक लागली आहे का? असा आक्रोश करत संतप्त नगरसेवकांनी बुधवारी (दि. १७) महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. महापौर रूपाराणी निकम यांच्यासह नगरसेवक पाणी आणि टँकरसाठी अधिकार्‍यांवर भडकले. त्‍यामुळे पाण्यावरून रणकंदन माजले.

सभागृहात तब्बल दीड तास नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ घातला. पाणीपुरवठा आणि टँकरचे ढिसाळ नियोजन होत असल्याने अधिकार्‍यांची खरडपट्टी केली. दरम्यान, महापालिकेने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव तयार केला असून महासभेत त्यावर निर्णय होणार होता. परंतु, कोल्हापूर शहरात पाणीटंचाई सुरू आहे. त्यातच दरवाढ केल्यास नागरिकांचा रोष पत्करावा लागेल, यामुळे त्यासंदर्भातील निर्णय पुढील महिन्यातील सभेत घेण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर का घेत नाही?

कोल्हापूर : पाणी नसल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते. नगरसेवकांना जीव नकोसा झाला आहे. आम्ही आमच्या घरात पाणी द्यायला सांगत नाही, नागरिकांसाठी पाणी मागतोय. महापालिकेला भीक लागली आहे का? भिकारडी महापालिका आहे का? पाणी पुरवठ्यासाठी टँकर का घेत नाही? असे म्हणत कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (दि. १७) नगरसेवकांनी प्रचंड आरडाओरडा करत संताप व्यक्त केला.

भाडेतत्त्वावर वीस टँकर...

सभागृहात तब्बल दीड तास नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ घातला. पाणीपुरवठा आणि टँकरचे ढिसाळ नियोजन होत असल्याने अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. खोटे बोलत असल्याचा आरोप करून जल अभियंता हर्षजित घाटगे यांना धारेवर धरले. सभा तहकूब करण्याचा इशारा महापौर रूपाराणी निकम यांनी दिला. त्यानंतर सभागृह शांत झाले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड प्रमुख उपस्थित होते. आयुक्तांनी भाडेतत्त्वावर वीस टँकर घेण्याचे आदेश दिले.

पाणी... पाणी... पाणी...

काँग्रेसच्या नगरसेविकांनी टेबलवर हात बडवत ‘पाणी... पाणी... पाणी...’ असे म्हणून प्रश्नाला वाचा फोडली. सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नात राजकारण आणू नये, सर्वांनाच पाणी प्रश्न भेडसावत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वच पक्षांचे नगरसेवक उभा राहून गोंधळ घालू लागले. प्रचंड गदारोळ सुरू झाला. महापौर निकम यांनी संतापून सर्वांचे माईक काढून घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तरीही नगरसेवकांनी उभा राहून टँकर विषयी प्रचंड गोंधळ घातला.

पाण्याचा वर्षभर वणवा : महापौर

महापौर निकम म्हणाल्या, मी सुध्दा शहरातच राहते. पाण्याचा वर्षभर वणवा आहे. याला कारणीभूत नगरसेवकही आहेत. नैसर्गिक पाणीसाठा संपणार असल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला, पण त्याला विरोध झाला. माझ्या प्रभागातही पाणी नाही. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली. सभागृह नेता मुरलीधर जाधव यांनी जास्त क्षमतेचे टँकर घेण्याची सूचना केली. ऋतुराज क्षीरसागर यांनी २४ तासांत तीन शिफ्टमध्ये टँकरने पाणी देण्याची सूचना केली.

दुकानगाळेधारकांसाठी अभय योजना

महासभेत दुकानगाळेधारकांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. महापौर निकम यांच्यासह नगरसेवकांनी हा प्रश्न सुटल्यास महापालिकेचे उत्पन्न सुरू होईल, असे सांगितले. आयुक्त डॉ. भारूड यांनी १५ ऑगस्टपर्यंत अभय योजना देऊन हा प्रश्न संपावा, असे प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. त्यातून महापालिकसे ३५ ते ४० कोटी रु. मिळतील, असे सांगितले.

नगरसेवकांचा जीव जायची वेळ...

नगरसेवक वैभव माने यांनी पाणी नाही आणि टँकरही नसल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. स्थायी सभापती विशाल शिराळे यांनी टँकरचे वर्षभराचे नियोजन का केले नाही? अशी विचारणा केली. आदिल फरास यांनी महिनाभर पाणी नाही. टँकरचे चुकीचे नियोजन होत आहे. आमच्या अंगावर लोक येत आहेत. जीव जायची वेळ आली आहे. आम्ही टँकर विकत घेऊन नागरिकांना पाणी देत आहे, असे सांगितले. सुनील मोदी यांनी प्रशासनाने समन्वयासाठी बैठक बोलविण्याची सूचना केली. माधुरी नकाते यांनी टँकरचालक स्वतःच्या घरी जाऊन पाण्याच्या टाक्या भरत असल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT