Terwad Accident | कंटेनर चालकाच्या अटकेसाठी संतप्त नागरिकांचा ठिय्या 
कोल्हापूर

Terwad Accident | कंटेनर चालकाच्या अटकेसाठी संतप्त नागरिकांचा ठिय्या

मालकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी; कुरुंदवाडमध्ये तणाव

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : तेरवाड येथे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा बळी गेल्यानंतर अब्दुललाट येथील दाम्पत्याच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी चालकाला अटक करून मालकावरही गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरुवारी रात्री कुरुंदवाड येथील शासकीय रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. चालकाला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

मालवाहतूक कंटेनर चालक कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव जात असताना चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाला. यात निष्पाप प्रथम दोन पादचारी महिलांना धडक दिली. त्यानंतर पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना पाठीमागून धडक देत रस्त्याकडील झाडाला धडकून तो शेतात घुसला. गिरमल दाम्पत्य व शकिल मुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. मंगल पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतात अडकलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतला.

गुरुवारी रात्री चालकाचा शोध घेऊन त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत अब्दुललाट येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. अपघातातील मृतदेह ताब्यात घेण्यासही त्यांनी नकार दिला. चालकाच्या अटकेबाबत पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिस व आंदोलकांमध्ये चर्चा सुरू होती. तेरवाड-कुरुंदवाड मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात या मार्गावर पाच अपघात झाले असून, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विचित्र अपघातामुळे काळजाचा ठोका चुकला

तेरवाड येथे कंटेनर चालकाच्या बेफिरीमुळे झालेल्या भीषण विचित्र अपघातात चौघांचा बळी गेला. अपघातस्थळी पडलेले मृतदेह, जखमी नागरिक हे पाहताना नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. रस्त्यावरील अन्य नागरिकांनी क्षणाचा विचार न करता अपघातग्रस्तांना मदत केली. त्यानंतर रुग्णवाहिका, पोलिस दाखल झाले. काही कालावधीनंतर नातेवाईक दाखल होताच त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातस्थळ, कुरुंदवाड पोलिस ठाणे व शासकीय रुग्णालयात अब्दुललाट, तेरवाड, अर्जुनवाड, कुरुंदवाड येथे नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT