अनुराधा कदम
कोल्हापूर : महिलांमधील साध्या थकव्यापासून मातामृत्यूसारख्या जीवघेण्या स्त्रीरोग समस्यांच्या मुळाशी अॅनिमिया (रक्तक्षय) अर्थात रक्तातील लोहाची कमतरता असल्याचे अधोरेखित झाले आहे. राज्यात 15 ते 49 वयोगटातील महिलांसाठी हाच अॅनिमिया अनेक गंभीर आजारांमुळे शरीर पोखरणारा ‘सायलेंट किलर’ ठरत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NHFS-5) अहवालातून समोर आला आहे.
महिलांमधील रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व त्याचा थेट परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो.
देशांतर्गत अॅनिमियाग्रस्त महिलांचे प्रमाण 45 टक्के असलेल्या महाराष्ट्राला 2030 अखेर अॅनिमियामुक्त करण्याचे लक्ष्य गाठणे आव्हानात्मक बनले आहे.
52 टक्के गर्भवती अॅनिमियाच्या विळख्यात
52 टक्के गर्भवती अॅनिमियाग्रस्त असल्याने मातामृत्यू होण्याचे प्रमाण 30 टक्के आहे. अशा परिस्थितीत जन्मणार्या बाळांची वाढ 25 टक्क्यांनी कमी असल्याचेही निदर्शनास आले आहे.
अॅनिमिया म्हणजे काय?
रक्तातील हिमोग्लोबिन हा लोहघटक लाल रक्तपेशींमध्ये असतो, जो शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतो. सर्वसामान्य महिलांमध्ये 12 तर गर्भवती महिलांमध्ये 11 पेक्षा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर याला अॅनिमिया (रक्तक्षय) असे म्हटले जाते.
अॅनिमियामुळे महिलांमध्ये निर्माण होणार्या समस्या
* सतत थकवा व अशक्तपणा
* रोगप्रतिकारक शक्ती कमी
* गर्भधारणेदरम्यान गंभीर धोके
* मासिक पाळीच्या समस्या
* रजोनिवृती काळात शक्तिपात
* हृदयावर ताण
* मानसिक आरोग्यावर परिणाम
* त्वचा, केस व शरीरावर परिणाम