Anandacha Shidha scheme | ‘आनंदाचा शिधा’ बंद होण्याच्या मार्गावर Pudhari File Photo
कोल्हापूर

Anandacha Shidha scheme | ‘आनंदाचा शिधा’ बंद होण्याच्या मार्गावर

यंदाच्या गणेशोत्सवातही लाभ नाही; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सणासुदीला गोडधोड करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना तीन वर्षांतच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही गणेशोत्सवातही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले असले तरीही लाभार्थी मात्र प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने ऑक्टोबर 2022 मध्ये ‘आनंदाचा शिधा’ या योजनेचा शुभारंभ केला होता. दिवाळीनिमित्त शंभर रुपयात प्रतिकिलो डाळ, तेल, साखर, पोहे आणि रवा अशा पाच पदार्थांचे किट प्रारंभी देण्यात आले. यानंतर 2023 मध्ये गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत हा शिधा देण्यात आला. यानंतर गणेशोत्सव आणि दिवाळीत हा शिधा देण्यात आला. गतवर्षी अयोध्येत राम मंदिर उभारणी आणि शिवजयंतीनिमित्त हा शिधा देण्यात आला होता. राज्यातील सुमारे एक कोटी 60 लाखांवरील कार्डधारकांना सणासुदीला काळात जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा उद्देश शासनाचा होता. मात्र, गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापासून ही योजना ठप्प आहे. गतवर्षी दिवाळीत तसेच यावर्षी शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीला हा शिधा मिळेल, याची प्रतीक्षा होती; मात्र तीही फोल ठरली. यंदाच्या गणेशोत्सवात तरी हा शिधा मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवातही हा शिधा मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर लाभार्थी संख्या कळवणे, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला हा शिधा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे, त्यानुसार हा शिधा त्या त्या जिल्ह्यात पॅकिंग करून पोहोच करणे आणि त्याचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण करणे, या सर्व प्रक्रिया कराव्या लागतात. या प्रक्रियेला वेळ लागतो. यामुळे या योजनेसाठी किमान महिनाभराचा तरी कालावधी तयारीसाठी लागतो. मात्र, गणेशोत्सव काही दिवसांवर आला असला, तरीही जिल्हा पुरवठा कार्यालयात या योजनेबाबत सामसुमच आहे. यंदाही गणेशोत्सवात हा शिधा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहेच.

योजनेबाबत संभ्रमाचे वातावरण

राज्यात सध्या अनेक योजनांबाबत काटकसरीचे धोरण अवलंबले आहे, त्यात या योजनेचाही समावेश आहे. राज्य शासन या योजनेबाबत जाहीरपणे काहीच सांगत नाही. अधिकृत घोषणा नसल्याने या योजनेबाबत प्रत्येक सणासुदीच्यावेळी संभ्रमाचेच वातावरण असते. मात्र, गेल्या दोन वर्षांतील परिस्थिती पाहता ही योजना बंद होण्याच्याच मार्गावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT