कोल्हापूर : धन्यवाद सभेच्या तयारीची पाहणी करताना महायुती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, खा. धैर्यशील माने, समित कदम यांच्यासह महायुतीचे नेते, कार्यकर्ते.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Amit Shah Kolhapur Visits | केंद्रीय मंत्री अमित शहांच्या धन्यवाद सभेची जय्यत तयारी

महायुती नेत्यांकडून पोलिस ग्राऊंडची पाहणी; स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सरकारचे आभार मानण्यासाठी शनिवारी (दि. २०) कोल्हापुरात धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.

सभेच्या तयारीची पाहणी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी गुरुवारी पोलिस ग्राऊंडवर केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारच्या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यासाठी पोलिस ग्राऊंडवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे दहा हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अंबाबाई मंदिर विकासासाठी केंद्राने १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी १४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कामांना सुरुवात झाली असून त्याचा औपचारिक शुभारंभ आणि धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत. त्यामुळे महायुतीकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.’ पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘अंबाबाई मंदिर विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे. या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.’ यावेळी महापौर रूपाराणी निकम, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, समित कदम, सत्यजित कदम, आदिल फरास, सुजित चव्हाण, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पूर्वतयारीबाबत आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी अचूक पार पाडावी, याबाबतीत कोणतीही हयगय नको तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.

शहा यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहा

मंत्री शहा यांच्या कोल्हापूरमधील स्वागतासाठी शनिवारी (दि. २०) मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केले.

शियेतून अवजड वाहनांना नो एंट्री..

शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालय ते धैर्यप्रसाद चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या मार्गावर जाणाऱ्या वाहनांनी धैर्यप्रसाद चौक ते अजिंक्यतारा किंवा लाईन बाजार मार्गाचा वापर करावा. तसेच ताराराणी पुतळ्याकडून धैर्यप्रसाद चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. शियेकडून कसबा बावडा मार्गे ताराराणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना शिये येथे प्रवेश बंद केला असून, या वाहनांनी महामार्गावरून पुढे जावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT