कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील महादेव मंदिराचा आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराचा संदर्भ दिला. शहा म्हणाले, वडणगे येथील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फने दावा केला होता. बीडच्या कंकलेश्वरच्या 12 एकर जागेवरही वक्फने दावा सांगितला होता.
वडणगे : येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून वडणगे ग्रामपंचायत व मुस्लिम समाज यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. एकूण17 गुंठे जागेत मुस्लिम समाजाची मशीद व काही दुकानगाळे आहेत. करवीर भूमिअभिलेख, जिल्हा भूमिअभिलेख, उपसंचालक भूमिअभिलेख पुणे येथे झालेल्या सुनावणीत या जागेच्या मालकी हक्कावर मुस्लिम समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे. 29 एप्रिल 2024 रोजी उपसंचालक भूमिअभिलेख पुणे यांनी या जागेच्या मालकीपत्रात फेरफार करण्याचा आदेश दिल्यानंतर, ऑगस्ट 2024 मध्ये महसूल मंत्रालयात झालेल्या सुनावणीत भूमिअभिलेखच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडणगे येथील गट नंबर 89 मधील या जागेसंदर्भात लोकसभेत चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.