Elderberry Tree | रुईकर कॉलनीत आढळला अमेरिकेन एल्डरबेरी वृक्ष Pudhari File Photo
कोल्हापूर

Elderberry Tree | रुईकर कॉलनीत आढळला अमेरिकेन एल्डरबेरी वृक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहर परिसरातील वृक्षांचे निरीक्षण करताना डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना रुईकर कॉलनी येथील सानेगुरुजी सोसायटीच्या पाठीमागे असणार्‍या गुरुनाथ रेसिडेन्सी येथे शिवम जाधव यांच्या घरातील बागेत अमेरिकेन एल्डरबेरी वृक्ष आढळला. वृक्ष, अनेक लहान पांढर्‍या शुभ्र फुलांनी आणि गोल आकारांच्या अनेक लहान फळांनी लगडलेला होता.

वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘सॅम्बुकस कॉनाडेन्सिस’ असे असून व्हिबयुरनेसी या कुळातील आहे. या वृक्षाला इंग्रजीत कॉमन एल्डरबेरी, अमेरिकेन एल्डरबेरी व अमेरिकेन ब्लॅक एल्डरबेरी अशी विविध नावे आहेत. हा मूळचा उत्तर अमेरिका खंडातील आहे. भारतातील हिमालय पर्वत प्रदेशांत एल्डरबेरी वृक्ष नैसर्गिकपणे वाढललेले आढळतात तर केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रात या वृक्षाची सुशोभित वृक्ष म्हणून बागांमध्ये लागवड करतात. महाराष्ट्रात महाबळेश्वर (जि. सातारा) येथे या वृक्षाची शास्त्रीय नोंद झाली आहे.

एल्डरबेरी हा लहान आकाराचा वृक्ष असून चार मीटर उंचीपर्यंत वाढतो. पाने संयुक्त प्रकाराची असून सुमारे एक फूट लांब वाढतात. प्रत्येक पानावर पाच, सात किंवा नऊ पर्णिका असतात. फुले लहान, पांढर्‍याशुभ्र रंगांची असून, फांद्यांच्या टोकांवर छत्राकारी, संयुक्त पुष्पमंजिरीत येतात. फळे लहान, गोलाकार असून संयुक्त गुच्छात येतात. प्रत्येक फळामध्ये तीन ते पाच कठीण आवरणाच्या बिया असतात. फळे पिकल्यानंतर चकचकीत निळसर काळ्या रंगांची असून, खाण्यायोग्य असतात. मुळांपासून तयार होणार्‍या फुटव्यांपासून आणि बियांपासून रोपे तयार होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT