कोल्हापूर : कपाळी भंडारा आणि मुखातून ‘उदं गं आई उदं’चा अखंड नामघोष करणारे हजारो भाविक, वरण-वांगं, मेथीची भाजी, वडी-भाकरी, गाजर, कांदापात, लिंबू, केळीचा नैवेद्य, मानाचे जग आणि पारंपरिक पालखी सोहळा अशा पारंपरिक वातावरणात शनिवारी ओढ्यावरची आंबिल यात्रा झाली. दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती.
दर्शन रांगेत बॅरिकेटस्ची व्यवस्था केली होती. मंदिराचा परिसर गजबजून गेला होता. शिवाजी पेठ, मंगळवार पेठसह सर्व पेठा, उपनगरे आणि ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरातून नियमित सुरू असणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली होती. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस क्रेन व तत्सम यंत्रणेसह सज्ज होते. पोलिस बंदोबस्तही तैनात होता. यात्रेचे संयोजन दत्तसम—ाट तालीम मंडळ, ओढ्यावरील रेणुका मंदिर यात्रा व उत्सव कमिटीचे मुख्य पुजारी मदनआई शांताबाई जाधव, कार्याध्यक्ष प्रीतम यादव, अध्यक्ष उमेश यादव, प्रथमेश जाधव व सहकार्यांनी केले.
मंदिरात पहाटे 4 वाजता महाभिषेक व रेणुकादेवीची अलंकारिक पूजा केली. दुपारी 4 वाजता आरती आणि पारंपरिक पालखी सोहळा झाला. रेणुकादेवी, परशराम व मातंगीदेवीच्या भोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्या. रात्री 9 वाजता मानांच्या जगासह आरती व प्रदक्षिणा झाली. यानंतर जगांचे ज्या त्या ठिकाणी प्रस्थान झाले. रात्री 12 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
भाविकांनी मंदिर परिसरात नैवेद्याचा सहकुटुंंब आस्वाद घेतला. वडी-कढी, भाकरी, वरणे-वांगे, मेथी, गाजर, कांदापात, लिंबू, केळी यावर ताव मारला. अनेकांनी मोबाईलवर फोटो व व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केले. खेळणी, खाद्य पदार्थ, प्रसाद आणि वस्तूंची खरेदीही करण्यात आली.
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मंदिर परिसरात आवर्जून उपस्थिती राहून सेवा दिली. भाविकांसह संयोजनातील पोलिस, महापालिका, महावितरण व आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांसाठी पिण्याचे पाणी, सरबत, चहाची व्यवस्था काहींनी केली होती. तसेच अनेक ठिकणी शुभेच्छा फलकही लावले होते.