कोल्हापूर : नवरात्रौत्सवातील अष्टमीला अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी झालेली अलोट गर्दी.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ambabai Nagar Pradakshina | अंबेच्या जयघोषात अष्टमीची नगरप्रदक्षिणा

रथमार्गावर रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, विद्युत रोषणाई, थ्रीडी अंबाबाई मुखवट्याने वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भाविकांची प्रचंड गर्दी, ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बँडच्या सुरांसह विविधरंगी विद्युत झोतांच्या झगमगाटात, भाविकांच्या साक्षीने सोमवारी रात्री नवरात्रौत्सवातील अष्टमीचा करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने नगरप्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्या आणि विविधरंगी रांगोळ्यांनी सजला होता. न्यू गुजरी मित्र मंडळाने गुजरी कॉर्नर येथे उभारलेला थ्रीडीमधील श्री अंबाबाईचा मुखवटा पाहण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊच्या सुमारास अंबाबाईच्या रथाचे पूजन झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मानकरी उपस्थित होते. आकर्षक फुलांनी सजवलेल्या आणि हत्तीच्या आकारातील कमानीने मढवलेल्या रथामध्ये अंबाबाईची प्रसन्न उत्सवमूर्ती विराजमान झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महाद्वारमार्गे, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रथापरंपरेनुसार ऐतिहासिक श्री तुळजाभवानी मंदिरात पानविडा देऊन स्वागत झाले. नगर प्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद झाले आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला.

भाविकांना प्रसाद वाटप

महाद्वार रोडवर नगर प्रदक्षिणा मार्गावर गुजरी येथे श्री अंबाबाईचा थ्रीडी मुखवटा साकारला होता. तो पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी कोल्ड स्पायरो आतषबाजीही करण्यात आली. ही आतषबाजी मोबाईच्या कॅमेरामध्ये चित्रित करण्यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरू होते. तसेच या ठिकाणी तीन हजार किलो तुपातील शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT