कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईदेवीच्या चरणांचा सूर्यकिरणांनी केलेला चरणस्पर्श, मंदिराच्या प्राचीन वास्तूतून प्रवास करीत गर्भगृहात पोहोचलेल्या सूर्यकिरणांचा अद्भुत सोहळा रविवारी सायंकाळी झालेल्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या चाचणीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या चरणांना स्पर्श करताच चाचणी यशस्वी झाल्याचे खगोलतज्ज्ञांच्या वतीने जाहीर करण्यात आले. दरम्यान, सोमवार, दि. ९ पासून अंबाबाई मंदिरातील मुख्य किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
दक्षिणायन किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मंदिर परिसरात सूर्यकिरणांच्या प्रवासाची चाचणी घेण्यात आली. विवेकानंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी लक्समीटरच्या साहाय्याने किरणांचा प्रवास, त्यांची वेळ आणि तीव्रता यांची नोंद केली. महाद्वार रोडवर सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे पोहोचली. त्यावेळी त्यांची तीव्रता २० हजार लक्स इतकी होती. पुढे ५.१२ वाजता गरुड मंडपात ९ हजार ४३० लक्स तीव्रता नोंदवण्यात आली. ५.२२ वाजता गणपती मंदिराच्या मागील बाजूस किरणे पोहोचली, तर ५.३१ वाजता पितळी उंबरठ्यावर त्यांची तीव्रता ४२२ लक्स इतकी नोंदली गेली.
यानंतर सूर्यकिरणांचा प्रवास गर्भगृहाच्या दिशेने सुरू राहिला. सायंकाळी ५.४३ वाजता गाभाऱ्याच्या दुसऱ्या पायरीवर, तर ५.४५ वाजता गर्भगृहात १०.१ लक्स तीव्रतेची नोंद झाली. अखेर ५.४७ ते ५.४८ या दरम्यान सूर्यकिरणांनी अंबाबाईदेवीच्या मूर्तीच्या चरणांना स्पर्श केला. किरणोत्सवाच्या या चाचणीत अपेक्षित टप्प्यांवर सूर्यकिरणे पोहोचल्याने मुख्य सोहळ्याच्या तयारीला सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
आजपासून होणाऱ्या किरणोत्सवाचे वेध
सोमवार, दि. ९ ते बुधवार, दि. ११ या तीन दिवसांत दक्षिणायन किरणोत्सवाचा मुख्य सोहळा होणार आहे. मंदिराच्या स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे होणाऱ्या किरणोत्सवाचे वेध भाविकांना लागले आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांसह मंदिर स्थापत्य आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.