Ambabai Temple AI data | अंबाबाई मंदिरातील ‘एआय’चा डेटा आता डीपीयू सर्व्हरवर 
कोल्हापूर

Ambabai Temple AI data | अंबाबाई मंदिरातील ‘एआय’चा डेटा आता डीपीयू सर्व्हरवर

शेतकरी संघाच्या इमारतीत सर्व्हर प्रणाली कार्यान्वित होणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रौत्सवाच्या काळात गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा डेटा यापुढे अधिक सुरक्षित ठेवला जाणार आहे. गतवर्षी या यंत्रणेसाठी बाहेरील सर्व्हरचा वापर करण्यात आला होता. मात्र, यंदापासून मंदिर प्रशासनाकडून स्वतःचा ‘डीपीयू’ सर्व्हर घेण्यात येणार असून, त्यावर एआय यंत्रणेसह सीसीटीव्हीशी संबंधित डेटा सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ही सर्व्हर यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरातील सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाची माहिती यावेळी घेण्यात आली. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला डेटा सुरक्षित राहावा, यासाठी स्वतंत्र डीपीयू सर्व्हरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

होमगार्डचीही होणार नियुक्ती

नवरात्रौत्सवाच्या काळात शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेऊन तेथे डीपीयू सर्व्हरची प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. पहिल्या दिवसापासून ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याने गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेला तांत्रिक आधार मिळणार आहे. याशिवाय सुरक्षेत वाढ करण्यासाठी होमगार्डची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याशी चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT