कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेत एअर एब्रेशनचे काम करताना कारागीर.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ambabai Temple | पाऊस, आर्द्रता आणि प्रदूषणापासून अंबाबाई मंदिराला मिळणार संरक्षण

संवर्धन प्रक्रियेत एअर एब्रेशनसह जलप्रतिबंधक आवरण तंत्राचा वापर

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या बाह्य भागावरील काळवंडलेला थर हटवण्यासाठी ‘एअर एब्रेशन’ प्रक्रियेनंतर आता मंदिराच्या दगडी शिल्पांचे पाऊस, आर्द्रता आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी विशेष जलप्रतिबंधक (वॉटर रिपेलंट) संरक्षणात्मक आवरण लावण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिराच्या मूळ दगडी रचनेचे आणि कोरीव शिल्पवैभवाचे दीर्घकालीन जतन होण्यास मदत होणार आहे.

एअर एब्रेशन ही दगडी वारसा वास्तूंच्या संवर्धनासाठी वापरली जाणारी आधुनिक आणि नियंत्रित प्रक्रिया आहे. या तंत्रज्ञानाद्वारे दगडाला कोणतीही हानी न पोहोचवता त्यावरील धूळ, प्रदूषण, शेवाळ, धूर आणि काळवंडलेला थर काढण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून झाकोळलेली मंदिराची मूळ कलाकुसर आणि दगडी सौंदर्य पुन्हा खुलून आले आहे.

संवर्धनाच्या पुढील टप्प्यात मंदिराच्या बाह्य दगडी पृष्ठभागावर विशेष जलप्रतिबंधक आवरण दिले जाणार आहे. हे आवरण पावसाचे पाणी दगडामध्ये झिरपू देत नाही, तसेच वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम कमी करते. परिणामी दगडांवर शेवाळ, बुरशी आणि क्षरणाची प्रक्रिया मंदावून शिल्पांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. एअर एब्रेशननंतर जलप्रतिबंधक आवरण देणे ही वारसा वास्तूंच्या संवर्धनातील महत्त्वाची आणि शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे अंबाबाई मंदिराचे मूळ ऐतिहासिक आणि स्थापत्य वैभव दीर्घकाळ सुरक्षित राहण्यास मदत होणार असून, भविष्यातील देखभाल आणि संवर्धनाची गरजही तुलनेने कमी होईल.

एअर एब्रेशन म्हणजे काय?

एअर एब्रेशन पद्धतीत कमी दाबाच्या हवेबरोबर अतिसूक्ष्म अपघर्षक कण दगडाच्या पृष्ठभागावर फवारले जातात. त्यामुळे धूळ, प्रदूषण, धूर, शेवाळ आणि काळवंडलेला थर निघून जातो; मात्र दगडाच्या मूळ रचनेला किंवा कोरीव शिल्पांना कोणतीही हानी होत नाही.

जलप्रतिबंधक आवरण म्हणजे काय?

जलप्रतिबंधक आवरण दगडाच्या पृष्ठभागावर दिल्यानंतर पावसाचे पाणी व आर्द्रता दगडात झिरपत नाही; मात्र दगडातील नैसर्गिक वाफ बाहेर पडू शकते. त्यामुळे दगडाचे श्वसन कायम राहते, शेवाळ व बुरशीची वाढ कमी होऊन मंदिराच्या दगडी शिल्पांचे आयुष्य वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT