कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक, दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या, राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला लवकरच प्रारंभ होणार आहे. यामुळे अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूंचा परिसर आता मोकळा होणार आहे. कोणत्याही दरवाजातून कोणत्याही ठिकाणी सहज जाता येणार आहे. पहिल्या टप्प्यात बिनखांबी गणेश मंदिर ते दक्षिण दरवाजा हा दोन एकराचा परिसर खुला होणार आहे. यानंतर महाद्वार रोड आणि जोतिबा रोडवरील परिसर खुला होईल. अखेरच्या टप्प्यात सरलष्कर भवन आणि शेतकरी संघ इमारत परिसरातील कामे होणार आहेत. याकरिता एकूण साडेचार एकर जागेचे संपादन केले जाणार असून एकूण 11 एकर परिसरात हा आराखडा राबविला जाणार आहे.
मंदिराच्या आवारातील 64 योगिनींचे संवर्धन व जतन करण्यासाठी दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम होणार. मंदिराच्या संवर्धनाचेही काम केले जाणार आहे. यासह नगारखाना, गरुड मंडप, मनकर्णिका कुंडांचे 104 कोटींचे काम अगोदरच सुरू करण्यात आले आहे.
दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूला दुकाने असतील. पूजेच्या साहित्यासह विविध पारंपरिक वस्तूंची खरेदी भाविकांना या दुकानांत करता येणार. याच परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध असेल. भाविकांनाही या ठिकाणी बसण्याचीही व्यवस्था असेल.
बिनखांबी गणेश मंदिर ते दक्षिण दरवाजा हा सर्व परिसर खुला केला जाणार. यानंतर या परिसरात भुयारी दर्शन मार्ग उभारला जाणार. सात हजार भाविकांची ही दर्शन रांग असेल. दर्शन रांगेत हॉल असतील, त्यात भाविकांना बसण्याची, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा असतील.
बिनखांबी गणेश मंदिर ते दक्षिण दरवाजा या परिसरात भुयारी पार्किंगचीही व्यवस्था असेल. या ठिकाणी 50 चारचाकी थांबवता येणार आहेत. यासह एक केएमटी (शहरी बस) उभी करता येणार आहे. या वाहतुकीचा दर्शन रांगेवर अथवा भाविकांच्या ये-जा करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
भवानी मंडप परिसरात ‘हेरिटेज प्लाझा’
ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात हेरिटेज प्लाझा साकारला जाणार आहे. त्याद्वारे या संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या सुशोभिकरणासह पर्यटन विषयक सुविधा देण्यात येणार आहेत.
किरणोत्सव मार्गातील अडथळे, अतिक्रमणांचे निर्मूलन
अंबाबाई मंदिराच्या किरणोत्सवात गेल्या काही वर्षांपासून अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे अनेकदा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करून या मार्गातील अतिक्रमणे दूर केली जाणार आहेत.
स्थानिक व्यापार्यांसाठी होणार बाजारपेठ
मंदिर परिसरातील दुकानगाळ्यांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. या परिसरातील भूसंपादन केले जाणार असून त्यातील स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांसाठी मंदिर परिसरातच स्वतंत्र बाजारपेठ साकारली जाणार आहे.
मंजूर आराखडा 1445 कोटी 97 लाख
भूसंपादनसाठी : 980 कोटी 12 लाख
(पहिला टप्पा : 257 कोटी)
विकासकामे : 465 कोटी 85 लाख
(पहिला टप्पा : 200 कोटी)